नाशिक : घरात कुणी नसल्याची संधी साधत महिलेचा विनयभंग करणा-या आरोपीस अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.के.ढवळे यांनी एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २९ एप्रिल २०१८ रोजी ध्रुवनगर भागात घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रशांत गोरख देसले (२८, धनश्री अपा. धु्रवनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला २९ एप्रिल रोजी आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधत आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्याने विनयभंग करीत तू माझ्याशी संबध ठेवले नाही तर तुला बरबाद करून टाकेल अशी धमकी दिली होती. यानंतर त्याने सोशल मीडियावर संदेश व्हायरल करून बदनामी केल्याने महिलेने पोलीस ठाणे गाठले होते. याप्रकरणी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालीन महिला उपनिरीक्षक एन.टी.सुर्यवंशी यांनी केला. आरोपीविरूध्द सबळ पुरावे गोळा करून त्यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी क्र.७ यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे अॅड. एस.एच.सोनवणे आणि राजेंद्र सुर्यवंशी यांनी काम पाहिले. गंगापूर पोलीस ठाण्याचे कोर्ट ड्युटी कर्मचारी वाय.सी.पवार यांनी त्यांना सहाय्य केले. फिर्यादी,साक्षीदार आणि पंचांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भादवी कलम ३५४,३५४ अ व ५०६ अन्वये प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन कलमान्वये प्रत्येकी दोन हजार तर ५०६ अन्वये ५०० रूपयांचा दंड ठोठावला.