नाशिक – महावितरणच्या नाशिक मंडल कार्यालयातील उच्चस्तर लिपिक महेश अशोकराव कवडे हे तपोवन भागातील थकबाकीदार ग्राहकाला वीज देयकाच्या भरणा करण्यास सांगून आपले कर्तव्य बजावीत असताना याचा राग येऊन त्यांना काशी मंगल कार्यालयाचे मागे नाशिक येथे शुक्रवारी मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार आरोपीविरुद्ध भ्रद्रकाली पोलीस स्टेशनला भा.दं.वि नुसार ३५३,३३२,३४१ व ५०४ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे लिपिक महेश कवडे हे तंत्रज्ञ रामदास गांगुर्डे यांचे समवेत शुक्रवारी तपोवन लिंक रोड जवळील ग्राहक गणपती भोंग यांना थकीत वीज देयकाचा भरणा करण्यास सांगून तेथून काशीमंगल कार्यालयाचे मागे गेले असता तेथे आरोपी समर माळी व त्याचा मित्र यांनी त्यांना अडविले. वीज देयकाची मागणी करीता घरी का गेले. या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांचे विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशनला महेश कवडे यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, थकबाकी वसुल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने ग्राहकांनी वीज वापराच्या देयकांचा वेळेत भरणा करावा व अखंडितपणे ग्राहक सेवेत असलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांशी सौजन्यपूर्ण व्यवहार करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.