मुंबई/नाशिक – नाशिक महानगरपालिकेत २००५ ते २०१३ या काळात भरती घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे. या काळात तब्बल १३२ पदे अतिरीक्त भरण्यात आली आहेत. त्यास शासनाची कुठलीही मान्यता नव्हती. याची गंभीर दखल राज्याच्या नगर विकास विभागाने घेतली आहे. २००५ ते २०१३ या काळात प्रचलिक धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील पदे भरणे अपेक्षित असताना तत्कालिन अधिकाऱ्यांनी थेट अतिरीक्त १३२ पदे भरल्याबाबत नगर विकास विभागाने ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने नाशिक महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या चौकशीनुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि योग्य ती कारवाईही त्यांच्यावर करावी, तसेच त्याचा अहवाल नगरविकास विभागाला पाठवावा, असेही बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्या काळात ही भरती केलेल्या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. या आदेशामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव हे चौकशी समिती नेमून या प्रकरणी कारवाई करतात की अन्य काही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.