मुंबई/नाशिक – नाशिक महापालिकेत अखेर भरती करण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने हिरवा कंदिल दिला आहे. मात्र, ही भरती सर्वसाधारण राहणार नाही तर अनुकंपा तत्वावरील राहणार आहे. या भरतीसंदर्भात वारंवार मागणी केली जात होती. त्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. अखेर नगरविकास विभागाने मान्यता देऊन भरतीचा मार्ग मोकळा केला आहे. २०१५ पासून ते आतापर्यंत अनुकंपा तत्वावरील रिक्त पदे सरकारी निर्णयानुसार भरण्यात यावीत, असे पत्र नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे. तशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी व कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण (बंटी तिदमे) यांनी दिली आहे. या भरतीमुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे. याद्वारे अनुकंपातत्वावरील थेट १९७ पदे महापालिकेला भरता येणार आहेत. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात कर्मचारी महापालिकेतून निवृत्त झाले आहेत. नवीन भरती न झाल्याने नाशिककरांना योग्य सेवा मिळण्यातही अडचणी येत आहेत. त्यात आता ही भरती होणार असल्याने महापालिकेच्या सेवांचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे.