नाशिक – महानगरपालिकेच्या मॉलेक्युलर लॅबला आय.सी.एम.आरने मान्यता दिली आहे. असून यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल लवकर प्राप्त होण्यास मदत होणार आहे. दिवसाकाठी ४ हजार चाचण्यांचा अहवाल देण्याची या लॅबची क्षमता आहे. तशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बिटको रुग्णालयात मॉलेक्युलर लॅब उभारण्याच्या दृष्टीने आय.सी.एम.आरकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास आज आय.सी.एम.आर ने मान्यता दिली आहे. जिल्हा नियोजन समिती (डी.पी. डी.सी.)च्या निधीतून ही लॅब बिटको रुग्णालयात उभारण्यात आली आहे.
यामुळे नाशिक शहरात सुमारे तीन ते चार हजार कोविड-१९ ची आर.टी.पी सी.आर. सॅम्पलची तपासणी होणार आहे. तसेच आर.टी.पी सी.आर. सॅम्पलची तपासणीसाठी जिल्ह्याच्या बाहेरून व इतरत्र ठिकाणांहून तपासणी करून आणण्यास विलंब होत होता. या परवानगीमुळे हा विलंब टाळता येणे शक्य होणार आहे. आर.टी.पी.सी.आरचे अहवाल लवकर प्राप्त होण्यास मदत होणार आहे. ही मॉलेक्युलर लॅब पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने पुरेशा स्टाफची नियुक्ती केली असल्याचेही आयुक्त जाधव यांनी सांगितले आहे.