नाशिक – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने यंदा “मिशन विघ्नहर्ता“ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पर्यावरणपुरक व फिजीकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेतली जाणार आहे.
महापालिकेने त्यासाठी विशेष संकेतस्थळ तयार केले आहे. गणेश विसर्जनासाठी अपॉईंटमेंट घेण्यासाठीची सुविधा त्यात देण्यात आली आहे. सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात, सुरक्षित व पर्यावरणपुरक पद्धतीने व्हावा यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. गणेशाची प्राणप्रतिष्ठा ही शाडू मातीचीच करावी, असा आग्रह महापालिकेचा आहे. नद्यांचे प्रदूषण टाळणे, प्लॅस्टिक, थर्माकोल याचा वापर न करणेबाबतही आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी विसर्जन स्लॉट बुकींग करावे, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पीओपी मुर्तीच्या विघटनासाठी अमोनियम बायोकार्बोनेट पावडरचे मोफत वितरण विभागनिहाय यंदाही करण्यात येणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले आहे. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करून हरित नाशिक, पर्यावरण युक्त नाशिक या संकल्पनेला साद द्यावी, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी केले आहे.