म्युनिसिपल कर्मचारी सेनेला यश
नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी मान्य करत नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे. तशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण (बंटी) तिदमे यांनी दिली आहे.
नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप, नगरसेवक तिदमे यांनी महासभेत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली होती. मात्र, राज्य शासनाची परवानगी मिळालेली नसल्याने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नव्हता. कर्मचाऱ्यांच्या मागणीला मंजुरी मिळावी यासाठी सेनेने मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांना पत्र दिले व पाठपुरावा केला. अखेर ही मागणी मान्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिल्याचे तिदमे यांनी सांगितले. सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.यासाठी सर्व म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या पदाधिकारी प्रयत्नशील होते.