नाशिक – महापालिका आयुक्तांनी अतिशय धडक कारवाई सुरू केली असून कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील हॉटेल्सची तपासणी केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी सिडको परिसराला अचानक भेटी देऊन हॉटेल्सवर कारवाई केली आहे.
नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शनिवारी कॉलेज रोड व परिसरात अचानक पाहणी केली. त्याचप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री नवीन नाशिक परिसरातील शिवाजी चौक, लेखा नगर, राणे नगर परिसरातील भाजी मार्केट व आदी भागाची पाहणी केली. यावेळी मास्क परिधान करणे बाबतचे नियम न पाळल्याबद्दल ३० जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील औषध विक्रेते व्यावसायिकांशी चर्चा करून ताप, थंडी सारख्या आजाराबाबतची औषधे रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
तसेच नवीन नाशिक परिसरातील हॉटेल स्पेन्स लेखानगर, हॉटेल उत्तम हिरा चावडी, लेखानगर व हॉटेल सचिन, लेखानगर या तीन हॉटेलमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. या पाहणीच्या वेळी आयुक्तांसमवेत घनकचरा व्यवस्थापन संचालिका डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयुर पाटील, अंबड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर आदी उपस्थित होते.