नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिका रुग्णालयांवर नागरिकांचा विश्वास वाढवा यासाठी नाशिक मनपाच्या पंचवटीतील इंदिरागांधी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील लस घेतली.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथील निवासस्थानी उपचार घेतले. त्यानंतर आज त्यांनी नाशिक शहरातील मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी याठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सर्व नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.