मद्यसेवनासाठी पैश्यांची मागणी
नाशिक : मद्यसेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी करीत त्रिकुटाने घरात घुसून सतरा वर्षीय मुलास बेदम मारहाण केल्याची घटना संतकबीरनगर भागात घडली. या झटापटीत मुलगा गॅलरीतून पडल्याने जखमी झाला असून, पोलीसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर अर्जुन शिंदे (२६),अक्षय उर्फ अमर जगन गायकवाड (२४) व अनिल जगन गायकवाड (२१ रा.समाज मंदिरामागे संत कबीरनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत संजय डोंगरे (१७ रा.भोसला स्कूल मागे, संत कबीरनगर) या मुलाने तक्रार दाखल केली आहे. गल्लीतील मुलीकडे बघून हसतो या कारणातून संशयीत आाणि तक्रारदारांमध्ये वाद असून शुक्रवारी (दि.२) दुपारी अनिकेत डोंगरे हा भरत कटारे यांच्या भंगार दुकानासमोरून पायी जात असतांना ही घटना घडली. संशयीतांनी मुलाचा रस्ता अडवित दारू सेवन करण्यासाठी ६० रूपयांची मागणी केली. यावेळी मुलाने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयीतांनी जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी मुलाने सुटकाकरून घेत धुम ठोकली असता संशयीतांनी पाठलाग करीत त्याचे घर गाठले. यावेळी पुन्हा त्यास मारहाण करण्यात आली. मुलाने बचावासाठी घरातील गॅलेरीत प्रवेश केला असता संशयीतांच्या झटापटीत तो जमिनीवर कोसळला. या घटनेत मुलगा जखमी झाला असून पोलीसांनी तिघा संशयीतांना अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाने करीत आहेत.
…