.
मदतीचा बहाणा, वृध्द दुचाकीस्वाराचे तोतया पोलीसांनी दागिणे लांबवले
नाशिक : मदतीचा बहाणा करीत वृध्द दुचाकीस्वाराचे तोतया पोलीसांनी दागिणे लांबविल्याची घटना कॅनोल रोड भागात घडली. सोनसाखळीसह अंगठ्या सुरक्षीत रूमालात बांधून देण्याचा बहाणा करून भामट्यांनी हा डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदू रघुनाथ घोडे (रा.पारिजातनगर,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घोडे ३१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जेलरोड येथील पाण्याच्या टाकींकडून पारिजातनगर येथे आपल्या घराकडे स्कुटीवर जात असतांना ही घटना घडली. कॅनोलरोडने घोडे प्रवास करीत असतांना समर्थ रद्दी दुकानासमोर त्यांना दोन अनोळखी इसमांनी अडविले. आम्ही पोलीस असून वाहन तपासणी सुरू आहे. यावेळी भामट्यांनी वयोवृध्द असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी सोनसाखळी व बोटातील अंगठ्या काढून ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे घोडे यांनी दागिणे काढण्याची तयारी दर्शविल्याने भामट्यांनी मदतीचा बहाणा करून दागिणे रूमालात बांधून देत असल्याचे भासवून हातचलाखीने सुमारे ५० हजार रूपये किमतीचे अलंकार लांबविले. त्यात सोनसाखळी आणि दोन अंगठ्यांचा समावेश आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष खडके करीत आहेत.
….
दोघांवर चाकू हल्ला केल्याची घटना
नाशिक : पत्नी आणि मुलास घेण्यासाठी आलेल्या मेव्हण्याने शालकासह पत्नीच्या मामे भावास मारहाण करीत दोघांवर चाकू हल्ला केल्याची घटना सिडको भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोटण रतन कोळी (रा.शिरपूर,धुळे) व त्याचा अनोळखी साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विजयनगर येथील कुणाल बागुल (रा.संभाजी चौक) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संशयीत लोटण कोळी हे तक्रारदाराचे मेव्हणे असून ते गुरूवारी (दि.४) आपल्या पत्नीसह मुलास घेण्यासाठी सासरवाडीस आले होते. यावेळी दोघा पती पत्नीत वाद झाल्याने हा प्रकार हातघाईवर आला. भाच्यास ताब्यात घेत असतांना शालक बागुल व पत्नीचा मामे भाऊ जयदिप बोरसे यांनी विरोध केल्याने संतप्त झालेल्या मेव्हण्यासह त्याच्या सोबत आलेल्या अनोळखी इसमाने दोघा भावांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच मेव्हण्याने सोबत आणलेला चाकूने दोघांवर वार केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.
……
जिन्यावरून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु
नाशिक : घरातील जिन्यावरून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. ही घटना सिडकोतील पवननगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मुरलीधर अशोक ठाकरे (रा.भगतसिंग चौक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ठाकरे बुधवारी (दि.३) रात्री आपल्या घरात जिन्यावरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
………
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : पेपर मिलमध्ये काम करणा-या २१ वर्षीय तरूण कामगाराने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना लहवितरोड भागात घडली. तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बाळू बुधा शिवरे (२१ रा.तळ मजला,बलकवडे राऊस मिल कंपाऊंड,लहवितरोड भगूर) असे आत्महत्या करणा-या कामगाराचे नाव आहे. बाळू शिवरे हा परिसरातील अजमेरा पेपर कंपनीतील कामगार असून गुरूवारी (दि.४) तो नियमीतपणे कामावर गेला होता. काही वेळातच तो घरी जावून येतो असे सांगून गेला परंतू बराच वेळ उलटूनही तो न परतल्याने अन्य सहका-यांनी त्याचा शोध घेतला असता तो आपल्या घरात मृत अवस्थेत मिळून आला. शिवरे याने आपल्या राहत्या खोलीत अज्ञात कारणातून गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.
……
नाल्यात पाय घसरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यु
नाशिक : नाल्यात पाय घसरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. ही घटना पंचवटी अमरधाम भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कुसूम बोडके असे मृत महिलेचे नाव आहे. बोडके या गुरूवारी (दि.४) अमरधाम पाठीमागील नाल्यात पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या कमरेस मोठी दुखापत झाल्याने नागरीकांनी त्यांना तात्काळ नाल्याबाहेर काढून जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
……………..
चैनस्नॅचर पुन्हा सक्रिय
नाशिक : शहरात चैनस्नॅचर पुन्हा सक्रिय झाले असून एकाच दिवसात वेगवेगळया भागात झालेल्या घटनांमध्ये दोन पादचारी महिलांच्या गळयातील अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी म्हसरूळ आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मखमलाबाद येथील पार्वताबाई विष्णू हिंगमिरे (६८ रा.ओमकार हौ.सोसा. पाण्याच्या टाकीजवळ) या गुरूवारी (दि.४) दुपारच्या सुमारास परिसरातील किरणा दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेवून त्या आपल्या बंगल्याच्या दिशेने पायी जात असतांना घरानजीक समोरून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या पोती तोडून पोबारा केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. दुसरी घटना वर्दळीच्या पाटील लेन नं.२ भागात घडली. जुन्या पंडित कॉलनीतील छाया उत्तम खोडे (रा.गौरव अपा.डोंगरे वसतीगृहाजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. छाया खोडे व त्यांची मुलगी कावेरी या दोघी मायलेकी गुरूवारी (दि.४) रात्री शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. व्हि.एन.नाईक महाविद्यालयाकडून त्या पाटील लेन नं.२ मार्गे त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना शिव प्रताप कॉलनीतील बंगला नंबर दोन समोर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे करीत आहेत.
….