नाशिक – पतीच्या निधनानंतर महिलेला हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही, या अनिष्ट चालीरितींना तिलांजली देत मंगलमय बहुउद्देशी महिला मंडळाने विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत सामाजिक परिवर्तनाचा नवीन अध्याय सुरू केला. .
कोणार्कनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आडगाव व जत्रा हाॅटेल परिसरातील सुवासिनी महिलांसह विधवा महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी वैधव्य आलेल्या महिलांच्या कपाळी हळदी कुंकू लावून संक्रांतीचा वाण म्हणून सप्तर्षी माळी लिखित ज्ञानज्योती पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. पतीच्या निधनानंतर अनेक वर्षानंतर कपाळी कुंकवाची बोटे लागल्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंगला माळी यांनी या वेळी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी विधवा महिलांसाठी हळदी कुंकूचे समर्थन करून, त्या वेळी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र आपण २१ व्या शतकात असूनही विधवा महिलांना हळदी कुंकूसह इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी वंचित ठेवतो, ही नक्कीच भूषणावह गोष्ट नाही. त्यामुळे येत्या काळात विधवा महिलांना प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळाच्या उपाध्यक्षा मंगला जाधव यांनी सांगितले, की मी स्वतः विधवा असून, अशा कार्यक्रमांपासून विधवा महिलांना दूर ठेवणे मला अजिबात मान्य नाही. पतीच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात त्यांची मुले, त्यांची प्राॅपर्टी व इतर वस्तू आयुष्यभरासाठी पत्नीसाठी असते, मग पतीच्या नावाने लावलेले कुंकू, मंगळसूत्र का नको. एखाद्या पुरुषाच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्या पुरुषाला अनेक कार्यक्रमांत सन्मानाने सहभागी केले जाते. त्याला टिळा लावला जातो. मात्र महिलांना असा दुजाभाव का केला जातो. यापुढे कोणत्याही महिलेने असा दुजाभाव सहन करायचा नाही. सवाष्ण महिलेसारखा सर्व शृंगार परिधान करून समाजात वावरायचे.
एका बाजूला आपली राहणीमान उंचावली आहे. मात्र आपण अजून जुन्या रुढी-परंपरांमध्ये जखडून बसलो आहोत. आजही विधवा महिलेला बालकाचे नामकरण, बारसे तसेच लग्नाच्या इतर विधींमध्ये सहभागी करून घेतले जात नाही. हा महिलावर्गाकडूनच महिलेचा अपमान आहे. याचा विचार करण्याची गरज असल्याचे सरचिटणीस चारुशीला माळी यांनी सांगितले. यापुढे संक्रांतीचा वाण म्हणून प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम घेतले जातील. या कार्यक्रमांना अक्षरबंध फाऊंडेशनने पुस्तके आणि रोपे पुरविण्याची तयारी दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे कोणत्याही महिलेने पतीच्या निधनांनंतर सौभाग्याचे लेणे मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या न काढण्याचा संकल्प यावेळी उपस्थित सवाष्ण महिलांनी केला. उपस्थित महिलांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. आम्हाला जीवन जगण्याची नवीन आशा निर्माण करणारा उपक्रम राबविल्याबद्दल विधवा महिलांनी मनापासून आभार मानले. यावेळी महिलांनी एकमेकांना तीळगुळ देत गळाभेट’ घेत आयुष्यभर एकमेकींना सामाजिक आधार देण्याचा निर्धार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगलमय बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मंगल माळी, मंगल जाधव, चारुशीला माळी, सरोजिनी धनोकार, अरुणा पगार, रश्मी धनोकार, ज्योती माळी, पूजा पुजारी, आरती जाधव यांच्यासह महिला मो्ठ्या संख्येने उपस्थित होत्या.