नाशिक : भावाच्या बँक लॉकरवर बहिणीने डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. जॉईन्ट लॉकरमधून बहिणीने भावाचे दागिणे लांबविले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली व्यवहारे (रा.भवानी चौक, मनमाड) असे भावाच्या लॉकरवर डल्ला मारणा-या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी आशिष चांदवडकर (गुलमोहर नगर,म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि संशयीत महिला एकमेकांचे भाऊ बहिण असून, त्यानी नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवटी शाखेत एकत्रीत लॉकर सुविधा घेतली आहे. मे महिन्यात तक्रारदार यांनी विश्वासाने आपल्या बहिणीकडे लॉकरची चावी दिली असता सदर महिलेने चांदवडकर यांच्या मालकीचे दागिणे परस्पर काढून घेतले. याप्रकरणी विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.
…….
वृध्दाच्या बँक खात्यावर भामट्यांचा डल्ला
नाशिक : पेटीएमची केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करीत वृध्दास क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून भामट्यांनी बँक खात्यातील ७० हजाराची रक्कम आॅनलाईन लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ७२ वर्षीय वृध्दाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २० जुलै रोजी ही घटना घडली. वृध्द आपल्या घरात असतांना भामट्यांनी त्यांना संपर्क साधला. यावेळी पेटीएम केवायसीची मुदत संपल्याचे सांगून भामट्यांनी केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याना करून वृध्दाच्या बँक खात्यातील रक्कम आॅनलाईन लांबविली. यावेळी संशयीतांनी वृध्दास क्विक सपोर्ट नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून बँक खात्यातील ६९ हजार ९९९ रूपयांची रोकड परस्पर लांबविली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहेत.
………
उघड्या घरातून लॅपटॉपची चोरी
नाशिक : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी मोबाईल आणि लॅपटॉप चोरून नेल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. याप्रकरणी एका विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश धनंजय मानकर (मुळ रा.दाभाडी – मालेगाव,हल्ली कृष्ण मंगल अपा.रोहित वाईन समोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मानकर सोमवारी (दि.२) आपल्या अभ्यासात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल असा सुमारे २० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार भुमकर करीत आहेत.