भाडेकरूच्या घरावर कब्जा
नाशिक: गेल्या ५० वर्षापासून न्यायालयात भाडे भरून रहात असतांना परस्पर कुलुप तोडून मायलेकाने कब्जा केल्याची घटना काजीपुरा कोट भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषा प्रकाश कोळी व त्यांच्या मुलगा (रा.धोंडगे मास्तर चौक,काजीपुरा कोट) अशी कब्जा करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी देवळाली पोलीस क्वार्टरमध्ये राहणारे महेश किसन सहाणे यांनी तक्रार दाखल केली आहे. सहाणे कुटूंबिय गेल्या ५० वर्षा पासून काजीपुरा कोट येथील घर नं. ३४१६ मध्ये वास्तव्यास आहे. न्यायालयाच्या परवानगीने रितसर भाडे भरून रहात असतांना शनिवारी (दि.१०) रात्री संशयीत मायलेकाने सहाणे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून घरातील साहित्य बाहेर फेकुन देत जबरदस्तीने घराचा कब्जा घेतला. अधिक तपास जाधव करीत आहेत.
….
दोघा अनोळखी मृतदेहांबाबत पोलीसांचे आवाहन
नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मिळून आलेल्या दोघांच्या मृतदेहांची अद्याप ओळख पटली नसून नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस नाईक एस.वाय.गवारे आणि पी.ए.पगारे यांनी केले आहे. शिवाजीरोडवरील जिमखाना बिल्डींग मधील सम्राट स्पोर्टस या दुकानाच्या पायरीवर गेल्या रविवारी (दि.४) ६० ते ६५ वयोगटातील वृध्दाचा मृतदेह मिळून आला. कुठल्या तरी आजाराने सदर इसमाचा मृत्यु झाल्याचा अंदाज असून त्याची अद्याप ओळख पटली नाही. सदर इसमा शरिराने सडपातळ,उंचा पाच बाय दोन,पांढरे केस अश्या वर्णनाचा असून त्याने अंगात निळसर रंगाचा कोट व पांढ-या रंगाचा शर्ट तसेच काळी पिवळी रंगाची स्पोर्ट पॅण्ट परिधान केलेली आहे. दुसरा मृतदेह त्र्यंबकनाका परिसरातील हॉटेल महाराजा जवळ ३१ मार्च रोजी मिळून आला. ४० ते ४२ वर्षीय इसमाचा काही तरी आजाराने मृत्यु झाला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर इसम रंगाने सावळा,चेहरा उभट,केस काळे अश्या वर्णनाचा असून त्याने अगात जांभळय़ा हिरव्या रंगाचा चेक्स शर्ट व काळी जिन्स परिधान केलेली आहे. सदर इसमांबाबत माहिती असल्यास अथवा नातेवाईकांनी भद्रकाली पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलस नाईक गवारे आणि पगारे यांनी केले आहे.
…..