भाडेकरूची माहिती लपविणे पडले महागात, एकाच इमारतीतील तीन घरमालकांवर गुन्हा
नाशिक : भाडेकरूची माहिती संबधीत पोलीस ठाण्यास कळविणे क्रमप्राप्त असतांना माहिती लपविणा-या एकाच इमारतीतील तीन घरमालकांविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश खर्चे (रा.ठाणे),रमेश इंगळे व सचिन शहा (रा.विद्याविकास सर्कल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत घरमालकांची नावे आहेत. संशयीतांचे लोटस हॉस्पिटल परिसरातील आर्चित विहार या सोसायटीत सदनिका असून त्या भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. शहरात परजिल्हा आणि परप्रांतीय गुन्हेगारांचे वास्तव्य चर्चेत आल्यानंतर शहर पोलीसांनी संबधीत पोलीस ठाण्यात भाडेकरूची नोंद करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार संशयीतांनी आपल्या भाडेकरूची माहिती पोलीसांना कळविणे गरजेचे असतांना माहिती लपविण्यात आली. सरकारवाडा पोलीसांनी याची खातरजमा केली असता ही बाब उघडकीस आली. संशयीतांच्या घरात गेल्या तीन ते चार वर्षापासून भाडेकरू राहत असतांना माहिती दडविण्यात आल्याने एकाच इमारतीत सदनिका असणा-या तीन घरमालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार मुक्तेसिंग राजपूत यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस नाईक आहिरे आणि भोये करीत आहेत.
……
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार मनपा कर्मचारी ठार
नाशिक : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मनपाचा सफाई कर्मचारी ठार झाला. हा अपघात पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव दरम्यान झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय सुभाष सारसर (३० रा.तलाठी कार्यालयापाठीमागे,वडाळागाव) असे मृत मनपा कर्मचा-याचे नाव आहे. अजय सारसर शुक्रवारी (दि.४) सकाळी सेवाबजावत असतांना ही घटना घडली. पाथर्डी फाटा भागातील साफसफाई करून ते पाथर्डी गावाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर (एमएच १५ डीएफ ७८०९) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सेलीब्रेशन हॉटेल समोर पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने (एमएच १५ एफव्ही ८००१) दुचाकीस धडक दिली. या अपघातात अजय सारसर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मृत अजयचा भाऊ किरण सारसर यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंपर चालक भास्कर काळे (रा.गौळाणेरोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.
………
सिडकोतील घरफोडीत दागिण्यांसह टीव्ही चोरी
नाशिक : बंद घराचे लॅचलॉक तोडून चोरट्यांनी टिव्ही आणि दागिणे असा सुमारे दिड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना अंबड लिंक रोडवरील इफको कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अरविंद जानकर (रा.मुक्ताई हौ.सोसा,इफको कॉलनी पाठीमागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. जानकर कुटुंबिय २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून घरातील एलसीडी टीव्ही आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेले १ लाख ३० हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत. भाडेकरूची माहिती लपविणे पडले महागात
………
चिडेमळयात एकाची आत्महत्या
नाशिक : नाशिकरोड येथील चिडे मळा भागात राहणा-या ४७ वर्षीय इसमाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुमेध विजय गवारे (रा.अनघा बी.सोसा. नवले चाळ) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. गवारे यांनी शुक्रवारी (दि.४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.
……….
शिवाजीनगरला तलवारधारी जेरबंद
नाशिक : औद्यगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात तलवारधारी पोलीसांच्या हाती लागला असून त्याच्या ताब्यातून धारदार तलवार आणि चॉपर हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपी किशोर गुप्ता (१९ रा.गिरीधर लोखंडे यांच्या घरात,मिनाताई ठाकरे गार्डनजवळ,जिजामाता कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या तलवारधारीचे नाव आहे. शिवाजीनगर येथील संभाजी कॉलनीत एका जवळ धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.४) सायंकाळी पोलीसांनी सापळा लावला असता पाण्याच्या टाकीजवळ संशयीतास बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्या जवळ पांढ-या गोणीत धारदार तलवार आणि चॉपर मिळून आला असून याप्रकरणी युनिटचे कर्मचारी शांताराम महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
…………..
श्रमिकनगरला महिलेची आत्महत्या
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणा-या २३ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कोमल गौरव रामसिंग (२३ रा.फुलचंद गामाप्रसाद याच्या रूममध्ये,श्रमिकनगर) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. कोमल रामसिंग या विवाहीतेने शुक्रवारी (दि.४) आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. घरमालक फुलचंद गामाप्रसाद (रा.रेणूकामाता चौक,श्रमिकनगर) यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत.