भरधाव दुचाकीने धडक दिल्याने अॅटोरिक्षा पलटी
नाशिक : भरधाव दुचाकीने धडक दिल्याने अॅटोरिक्षा पलटी होवून सहा वर्षीय बालिकासह तिची आई व एक महिला जखमी झाली. हा अपघात त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल भागात झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रध्दा अरूण सावळे (६ वर्ष), लीना अरूण सावळे (२५ रा.जाधव संकुल) व सुनंदा विठ्ठल सपकाळ (५०) अशी जखमींची नावे आहेत. रोहित दिलीप पारख (रा.दिपनगर,नाशिकपुणा रोड) असे रिक्षास धडक देणा-या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रफिक चांद शेख (रा.अष्टविनायक चौक,सावतानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख गुरूवारी (दि.१८) सातपूर येथून एमएच १५ एफयू ४६६३ या अॅटोरिक्षात प्रवासी भरून सीबीएसच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एबीबी सर्कल सिग्नलवर सिटी सेंटर कडून भरधाव येणारी दुचाकी (एमएच १५ एफ डब्ल्यू ४६६३) रिक्षावर आदळली. या अपघातात रिक्षा पलटी होवून वरील तीन जण जखमी झाले. अधिक तपास पोलीस नाईक पगार करीत आहेत.
…..
अंडाभूर्जी विक्रेत्याकडून ग्राहकांवर चाकू हल्ला
नाशिक : अंडाभूर्जीचे पैसे अगोदर द्यावे या कारणातून हातगाडा चालक बापलेकाने दोघांवर चाकू हल्ला केल्याची घटना मेहर सिग्नल परिसरात घडली. या घटनेत एकाच्या हाताच्या पंज्यावर तर दुस-याच्या कोपराखाली वार करण्यात आले असून दोघे मित्र जखमी झाले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव आहिरराव व मिलींद आहिरराव (रा.रामवाडी) अशी चाकू हल्ला करणा-या बापलेकाचे नाव आहे. याप्रकरणी योगेश बाळासाहेब लोखंडे (रा.नांदुरगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. अहिरराव यांचा मेहर सिग्नल भागात अंडाभुर्जी विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि.१९) रात्री लोखंडे व त्यांचे मित्र अमोल सोनवणे व सुरज सिंग आहिरराव यांच्या गाड्यावर रिक्षाघेवून जेवणासाठी गेले असता ही घटना घडली. अंडाभुर्जी देण्यापूर्वीच संशयीतांनी पैश्यांची मागणी केल्याने हा वाद झाला. संतप्त बाप लेकाने अगोदर पैसे देण्याच्या कारणातून ग्राहकांशी वाद घालत दोघा मित्रांवर कांदा कापण्याच्या सुºयाने वार केले. या घटनेत लोखंडे यांच्या पंज्यावर तर अमोल सोनवणे यांच्या उजव्या हाताच्या कोपराखाली वार करण्यात आला असून रिक्षावर दगड फेक करण्यात आल्याने नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार कोल्हे करीत आहेत.
……..
बालकावर चाकू हल्ला
नाशिक : मित्रास मारले या कारणातून दोन अल्पवयीन मुलांनी १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर चाकू मारून जखमी केल्याची घटना पेठरोड भागात घडली. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक शंकर इंगळे (रा.अश्वमेधनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इंगळे यांचा बारा वर्षीय मुलगा शुक्रवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास परिसरातील मनपा शाळेच्या मैदानात खेळत असतांना १३ व १४ वर्षीय दोघांनी त्यास गाठले. यावेळी दोघांनी अनिरूध्द या मित्रास का मारले असा जाब विचारत त्यांनी इंगळे यांच्या मुलाच्या डोक्याच्या मागील बाजूर चाकू मारून दुखापत केली. याप्रसंगी संशयीतांनी शिवीगाळ करीत तु पुन्हा भेटलास तर चाकूने भोसकून जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक गावीत करीत आहेत.
……
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार
नाशिक : सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीस मालट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला ठार झाली. हा अपघात काठे गल्ली सिग्नल भागात झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास पोलीसांनी अटक केली आहे.
नुतन आनंद गायकवाड (३१ रा.नागरेचाळ,जयभवानी नगर,टाकळीरोड) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आनंद गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक अजीज बेग मुस्ताक बेग (रा.वडाळागाव) यास पोलीसांनी अटक केली आहे. नुतन गायकवाड या शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी आपल्या एमएच १५ डीक्यू ८५५४ या दुचाकीवर उस्मानिया चौकाकडून घराकडे जात असतांना ही घटना घडली. काठे गल्ली सिग्नलवर सिग्नल पडल्याने त्या थांबल्या असता पाठीमागून येणा-या मालट्रकने (एमएच ०४ डीडी२२१८) दुचाकीस धडक दिली. या घटनेत त्या रस्त्यावर पडल्याने त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
…
पंचवटीत एकाची आत्महत्या
नाशिक : हिरावाडी भागात राहणा-या ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोद करण्यात आली आहे. कुणाल विलास गायकवाड (रा.त्र्यंबकनगर,हिरावाडी) असे आत्महत्या करणाºया व्यक्तीचे नाव आहे. गायकवाड याने शुक्रवारी (दि.१९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास फेटा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
….