नाशिक – ओझर येथील विमानतळावरुन आता अवघ्या तासाभरात बेळगाव गाठणाऱ्या नाशिक-बेळगाव विमानसेवेला शानदार प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी या सेवेला ७० टक्के बुकींग मिळाले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला. केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत स्टार एअर कंपनीच्यावतीने ही सेवा दिली जात आहे. या सेवेसाठी १९९९ रुपयांपासून पुढे भाडे आकारण्यात येत आहे.
ओझर विमानतळ पॅसेंजर टर्मिनलच्या ठिकाणी झालेल्या सेवा शुभारंभ प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, निमाचे मनिष रावल, हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शेषगिरीराव, सामान्य व्यवस्थापक ए. बी. प्रधान, दिपक सिंघल, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर, स्टार एअर कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सी.ए.बोपन्ना उपस्थित होते. पालकमंत्री यांचे हस्ते यावेळी स्टार एअर कार्यालयाचे, चेक इन कॉऊंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोर्डींग पासचे अनावरण पालकमंत्र्याच्या हस्ते राधाकृष्ण झडप व सुमन झडप या दाम्पत्यांला देवून करण्यात आले.
सध्या ओझर येथून अलायन्स एअरची नाशिक-पुणे, नाशिक-हैदराबाद, नाशिक-अहमदाबाद, ट्रुजेटची नाशिक-अहमदाबाद, स्पाईसजेटची नाशिक-बंगळुरू, नाशिक-नवी दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद ही सेवा सुरू आहे. बेळगाव सेवेमुळे नाशिक हे आता सहाव्या शहराशी हवाई सेवेद्वारे जोडले गेले आहे. याचा नाशिकच्या पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे. बेळगाव हे कर्नाटक राज्यात येते. त्यामुळे नाशिककरांना कर्नाटकात जाणे तसेच कोल्हापूर किंवा गोवा आणि अन्य शहरांना जाणे सोईचे होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस नाशिक-बेळगाव सेवा मिळणार आहे.
असे आहे वेळापत्रक