नाशिक : बिलाच्या कारणातून वाद घालत मृत रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात घडली. या घटनेत डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.राजेंद्र अरूण भोई (रा. पांडवनगरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.भोई कार्बन नाका येथील सुशीला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पाहतात. सोमवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास ते सहकारी उमाकांत वाघ यास सोबत घेवून हॉस्पीटलच्या पाठीमागे ठेवण्यात आलेला आॅक्सिजनचा साठा बघण्यासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात दोघांनी त्यांना गाठत हसन शिखालाल मनियार या रूग्णाच्या मृत्युबाबत तसेच दवाखान्याने आकारलेल्या बिलाबाबत जाब विचारला. डॉ.भोई कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या काळात आपल्या सहका-यांसमवेत सेवा बजावत असतांना संतप्त दुकलीने त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी दोघांनी तुम्ही बाहेर दिसा तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली. या घटनेत डॉ.भोई जखमी झाले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे करीत आहेत.