नाशिक – अनाथ मुलींच्या बालगृहात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वसतीगृहाच्या महिला अधिक्षकासह तिच्या मुलास जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. पेठ तालूक्यातील या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. अतुल शंकर अलबाड (३५) आणि सुशिला शंकर अलबाड (५२ रा.दोन्ही कापुरझीरा ता.पेठ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा खटला प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीमती संध्या.एस.नायर यांच्या न्यायालयात चालला. सरकारी वकिल अॅड.दीपशिखा भिडे यांनी आठ साक्षीदार तपासले असता मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मायलेकास प्रत्येकी दहा वर्ष सक्तमजूरी आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
२०१५ मध्ये घडली घटना
आदिवासी महिला संरक्षण समिती पेठ संचलित अनाथ मुलींचे बालगृह कापुरझीरा येथे २०१५ ही घटना घडली होती. दिवाळी निमित्त अन्य मुली आपल्या नातेवाईकांकडे गेलेले असतांना वसतीगृहाच्या अधिक्षका असलेल्या सुशिला अलबाड यांचा मुलगा अतुल अलबाड याने अनाथ असलेल्या अल्पवयीन मुलीस कार्यालयात बोलवून घेत बळजबरीने बलात्कार केला होता. ही बाब मुलीने अधिक्षक असलेल्या अलबाड यांच्याकडे कथन केली असता त्यांनीही तिला खोटे ठरवून मारहाण केली. त्यामुळे भेदरलेल्या मुलीने याची वाच्यता केली नाही. मात्र यानंतरही संशयीताने अत्याचार सुरूच ठेवला.
घटना २०१७ मध्ये उघडकीस आली
ही घटना २०१७ मध्ये उघडकीस आली. मुलगी सज्ञान झाल्याने तिला नियमानुसार शहरातील नासर्डी ब्रीज परिसरातील शासकीय महिलांचे अनुरक्षक गृहात हलविण्यात आल्याने या घटनेस उजाळा मिळाला. मुलीने अधिक्षीका सारिका गांगुर्डे यांच्याकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला.
मुंबईनाका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
अधिक्षीका गांगुर्डे यांनी मुलीस सोबत घेवून मुंबईनाका पोलीस ठाणे गाठल्याने याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पेठ पोलीसांकडे वर्ग करण्यात आला. तत्कालिन सहाय्यक निरीक्षक श्रीमती कमलाकर यांनी या गुह्याचा तपास केला. दरम्यान या गुह्याची वाच्यता होताच संपुर्ण राज्यात हे प्रकरण गाजले. सर्वस्थरातून संशयीतांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आल्याने मायलेकास अटक करण्यात आली होती.