बापलेकीच्या वादात फौजदार जखमी
नाशिक : बापलेकीच्या वादात फौजदार जखमी झाल्याची घटना शरपणपूररोडवरील स्नेहबंधन पार्क येथे घडली. या घटनेत मुलीच्या मैत्रीणीने उपनिरीक्षकाच्या डोक्यात किटली मारल्याने ते जखमी झाले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जखमी उपनिरीक्षकाच्या मुलीसह तिच्या मैत्रीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन काकडे (रा.पीएसआय कॉर्टर,स्नेहबंधन पार्क) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार काकडे मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास आपल्या घरी असतांना त्यांची मुलगी आपल्या मैत्रीणीस घेवून वडिलांच्या घरी आली होती. यावेळी पैश्याच्या वादातून दोघा बापलेकीमध्ये वाद झाला. मुलीने घरखर्चासह महाविद्यालयीन खर्चापोटी दहा हजाराची मागणी केल्याने बापलेकीचा वाद विकोपाला गेला. यावेळी संतप्त मुलीने किचनमधील सुरी घेवून आली तर तिच्या मैत्रीणीने जवळच पडलेली किटली उचलून फौजदार असलेल्या मैत्रीणीच्या वडिलांच्या डोक्यात टाकली. या घटनेत फौजदार काकडे जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक धुळे करीत आहेत.
……
रिक्षा चालकाकडून कोयत्याने हल्ला
नाशिक : मद्यप्राशन करण्यास पैसे दिले नाही या कारणातून अॅपे रिक्षाचालकाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना पेठरोड भागात घडली. याप्रकरणी जखमी तरूणाने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश कैलास जाधव (रा.फुलेनगर) असे हल्ला करणाºया रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्ता रंगनाथ गोसावी (रा.राऊ हॉटेलजवळ,पेठरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गोसावी मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास पेठरोड भागातील तन्मय रेडीयम दुकानासमोर उभा असतांना संशयीत रिक्षाचालकाने त्यास गाठले. यावेळी संशयीत जाधव याने गोसावी यांच्याकडे दारू सेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी केली. मात्र जाधव याने पैसे देण्यास नकार देताच संशयीताने त्यास शिवीगाळ करीत एमएच १५ यू ५६२९ या रिक्षातील शिटा खाली ठेवलेला कोयता काढून आणत गोसावी याच्या कपाळावर वार केला. या घटनेत गोसावी जखमी झाला असून, अधिक तपास जमादार मिसाळ करीत आहेत.
…..
अज्ञात वाहनाच्या धडकेत पल्सरस्वार ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पल्सरस्वार तरूण ठार झाला. हा अपघात दिंडोरीरोड वरील वाढणे कॉलनी भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
गौरव संजय वरठे (हल्ली घोटी ता.इगतपूरी मुळ रा.आंचलवाडी,अमरावती) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. वरठे हा युवक सोमवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास दिंडोरीरोडने आपल्या पल्सरवर (एमएच १५ सीई ९११६) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. जुना जकात नाका परिसरातील हनुमान मंदिरासमोर भरधाव अज्ञात वाहनाने पल्सरला धडक दिली. या अपघातात वरठे गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी प्रविण वरठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
……..
सिडकोत महिलेची पोत खेचली
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरला दिलीप चव्हाण (५५ रा.गणेशवाडी पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सरला चव्हाण या मंगळवारी (दि.२) आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सिडकोत गेल्या होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्या घरी परत जाण्यासाठी सावतानगर बसथांबा जवळून पायी जात असतांना पाठीमागून पळत आलेल्या भामट्याने त्यांच्या मानेवर थाप मारून सुमारे ६० हजार रूपये किमतीची पोत हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.
……
बोरगडला ७५ हजाराची घरफोडी
नाशिक : कुटूंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरफोडून सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. ही घटना बोरगड भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण पांडूरंग हिरे (रा.संग्राम सोसा.प्रगतीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. हिरे कुटूंबिय २७ फेब्रुवारी रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील बॅगेतील सुमारे ७५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.
………
दोन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून नुकत्याच दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सरकारवाडा आणि अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिकरोड येथील इमरान खान सलिम खान पठाण (रा.रंगोली सोसा.लॅमरोड) हे दि.२६ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त महापालिकेत आले होते. राजीव गांधी भवन येथील पूर्व दरवाजाच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली अॅक्टीव्हा एमएच १५ एचबी १३९९ पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गावीत करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील सदाशिवनगर भागात घडली. संदेश बाळू दोंदे (रा.जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दोंदे दि.७ जानेवारी रोजी सदाशिवनगर भागात आले होते. टीएनआरसी फुड हॉटेल समोर त्यांनी आपली अॅक्सेस एमएच १५ जीयू ४०१९ पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.
…….