बसस्थानकावर वृध्द महिलेच्या गळय़ातील ४० हजार रूपयाची पोत चोरट्यांनी लांबविली
नाशिक : शहरातील बसस्थानकांवर पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून, गर्दीची संधी साधत बसमध्ये चढणा-या वृध्द महिलेच्या गळय़ातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची दुपदरी पोत चोरट्यांनी हातोहात लांबविली. ही घटना जुने सिबीएस बसस्थानकात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रभागा संपत शेवाळे (६५ रा.शिवाजीनगर,दिंडोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेवाळे या कामानिमित्त शहरात आल्या होत्या. बुधवारी (दि.३१) दुपारी परतीच्या प्रवासासाठी सीबीएस बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. दिंडोरी येथे जाण्यासाठी त्या कळवण बस मध्ये चढत असतांना गर्दींची संधी साधत अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळयातील दुपदरी पोत हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.
….
आर्थिंक देवाण घेवाणीतून बेदम मारहाण
नाशिक : आर्थिंक देवाण घेवाणीतून त्रिकुटाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत टोळक्याने लाकडी दांडक्याचा वापर केल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश पेखळे,मयूर बच्छाव व अन्य एक अशी तरूणास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल अशोक पगारे (२७ रा.पवारवाडी,जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पगारे आणि पेखळे यांच्यात आर्थिक व्यवहार असून पगारे याने पेखळे कडून दहा हजार रूपयांची रक्कम हातऊसनवार घेतली आहे. मंगळवारी (दि.३०) रात्री संशयीत टोळक्याने मोरे मळा येथील सर्कल परिसरात पगारे यास गाठून पैश्यांची मागणी केली. यावेळी पगारे याने सध्या माझ्याकडे पैसे नाहीत मी लवकरच देईन असे सांगितल्याने संतप्त त्रिकुटाने त्यास लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या घटनेत पगारे जखमी झाला असून अधिक तपास हवालदार वडघुले करीत आहेत.
…..
खेळण्याच्या कारणातून मारहाण
नाशिक : लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणातून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील शिवशक्ती चौकात घडली. या घटनेत टोळक्याने लोखंडी रॉडचा वापर केल्याने एक जण जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश राजाराम चौधरी,गणेश प्रकाश चौधरी,चंद्रकांत राजाराम चौधरी व पवन अर्जुन चौधरी (रा.शिवशक्तीचौक,सिडको) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी संजय राजाराम महाकाळ (४७ रा.शिवशक्तीचौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि तक्रारदार एकमेकांचे शेजारी असून महाकाळ यांची लहान मुले सोमवारी (दि.२९) अंगणात खेळत असतांना संशयीतांनी त्यांच्या अंगावर पाणी टाकून शिवीगाळ केली. याबाबत महाकाळ यांनी जाब विचारला असता ही घटना घडली. संतप्त झालेल्या टोळक्याने महाकाळ यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली. यावेळी संशयीत गणेश चौधरी याने महाकाळ यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली. अधिक तपास शेळके करीत आहेत.
…
पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यु
नाशिक : घरात पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यु झाल्याची घटना देवळाली गावात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अंजली संजय जोशी (५० रा.जोशीवाडा,बाबू गेलू रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. जोशी या बुधवारी (दि.३१) सायंकाळी घरकामात व्यस्त असतांना अचानक पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.