बळजबरीने विवाह लावून देण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
नाशिक : भावास ठार मारण्याची धमकी देत तरूणीचे अपहरण करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. अपहरण कर्त्यांमध्ये युवकासह तीन महिलांचा समावेश असून या घटनेत मारझोड करीत टोळक्याने बळजबरीने विवाह लावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र युवतीने धुम ठोकल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ जाधव,सुलोचना जाधव,निकीता जाधव व मावशी नामक महिला (रा.सर्व कामगारनगर,सातपूर) अशी संशयीतांची नावे आहेत. रविवार कारंजा भागातील २१ वर्षीय तरूणी महापालिकेच्या पश्चिम कार्यालयात रोजंदारी कर्मचारी आहे. बुधवारी (दि.१०) सकाळी तरूणी नेहमी प्रमाणे आपल्या कामावर जात असतांना ही घटना घडली. रिक्षा प्रवास करून ती पंडीत कॉलनीत मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहचली असता संशयीतांपैकी सौरभ जाधव याने तिची वाट अडवून भावास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुस-या एका अॅटोरिक्षातून तीचे अपहरण करण्यात आले. यावेळी मोबाईल व पैसे बळजबरीने काढून घेत संशयीतांनी लग्नाच्या मागणीसाठी तिला मारहाण केली. प्रसंगावधान राखत तरूणीने टोळक्याचे लक्ष नसल्याची संधी साधून धूम ठोकल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.
…..
शहर व परिसरातील अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई
नाशिक : शहर व परिसरातील अवैध धंद्याना पोलीसांनी लक्ष केले असून, गुरूवारी (दि.११) लाखलगाव येथील जुगार अड्डा उध्दवस्त करीत ९ जणांना तर गोरेवाडी रेल्वे गेट भागात उघड्यावर जुगार खेळणा-या तीघांना बेड्या ठोकल्या. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औरंगाबाद रोडवरील लाखलगाव ते शिंदे गाव दरम्यानच्या चौफुली नजीक चायनिज हॉटेल भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरूवारी दुपारच्या सुमारास हॉटेल शेजारील पत्र्याच्या बंद घरावर छापा टाकला असता भाऊसाहेब रमेश गुंजाळ (रा.लाखलगाव) व अन्य आठ जण कल्याण टाईम व डे मिलन नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून युनिटचे कर्मचारी गणेश वडजे यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार वाढवणे करीत आहेत. दुसरी घटना आयएसपी प्रेसच्या मोकळया जागेत उघडकीस आली. हनुमान मंदिराच्या ओट्यावर सुनिल लक्ष्मण कांबळे,कैलास सुखदेव जाधव व सचिन एकनाथ भोळे (रा.सर्व जाधव वाडी,गोरेवाडी) आदी कल्याण नावाच्या मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस शिपाई विशाल पाटील यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत. ……..