घोटी – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या वासाळी परिसरात दोनच दिवसापूर्वी बिबट्याचा वावर निदर्शनास आल्यानंतर काल या गावाच्या शिवारात एका शेतकऱ्यांची बकरी चक्क एका महाकाय अजगराने विळख्यात धरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .दरम्यान ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून या बकरीची अजगराच्या तावडीतून सुटका करून तिचा जीव वाचविला आहे.दरम्यान या अजगराला वनविभागाने ताब्यात घेऊन जंगलात निर्जनस्थळी सोडले आहे.
याबाबत वृत्त असे की,इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने पाळीव कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना ताजीच असताना काल सायंकाळी या गावाच्या वनविभागाच्या हद्दीत असलेल्या भागात गावातील तुकाराम खादे या शेतकऱ्यांच्या बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या.संध्याकाळ झाल्याने या बकऱ्या गोळा करीत असतांना एक बकरी कमी भरली म्हणून सदर शेतकऱ्याने या बकरीचा शोध घेतला असता,जवळील एका खडकावर एक महाकाय अजगर या बकरीला विळख्यात घेऊन ठार मारीत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी या शेतकऱ्याने आरडाओरडा करीत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या बकरीची अजगराच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. दरम्यान कधी बिबट्याचे दर्शन होत असल्याने तर कधी अजगराचे दर्शन होत असल्याने वासाळी येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान वनविभागाने या अजगराला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.