राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासंचालक ललित गाभणे यांनी केले कौतुक
नाशिक – नाशिक फर्स्ट्च्या रस्ता सुरक्षा या उपक्रमामुळे एकूणच सुरक्षा संस्कृतीच्या विकासामध्ये पर्यायाने नाशिकच्या विकासात मोलाची भर पडेल”. असे उद्गार राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासंचालक ललित गाभणे यांनी ट्रॅफिक एज्युकेशन पार्कला भेट दिली त्यावेळी काढले. यावेळी ते म्हणाले की, रस्ते अपघात व औद्योगीक अपघातांची आकडेवारी बघता रस्ते अपघात हे औद्योगीक अपघातांच्या तिप्पटीने होत आहेत. नाशिक फर्स्ट सारखे ट्रफिक एज्युकेशन पार्क जागोजागी असावेत.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेविषयी दरवर्षी नवनविन प्रयोग करीत असते. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून आनंद महिंद्रा, कुमारमंगलम बिर्ला यांसारख्या आघाडीच्या उद्योजकांनी अध्यक्ष म्हणुन काम पहिले आहे. सध्या एस. एन. सुब्रमण्यम संस्थेचे अध्यक्ष आहेत. यामध्ये शासनाने नामांकीत केलेले, नियोक्त्यांच्या केंद्रीय संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे व कामगारांच्या केंद्रीय संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य यात असतात. नाशिक फर्स्टचे हे कार्य खूपच महान आहे. या टीमसोबत काम करायला मला आवडेल. नाशिक फर्स्ट ला भेट दिल्यावर नाशिक फर्स्ट चे सुयोग्य व उत्कृष्ट नियोजन पाहिल्यावर त्यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षेसंदर्भात राष्ट्रीय पातळीवर व्यापक कार्य करण्यास निश्चितच आवडेल.” असेही त्यांनी पुढे नमुद केले. ते पुढे असे म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत राष्ट्रीय सुरक्षा परिषद दरवर्षी वेगवेगळे पुरस्कार देत असते. भारतीय आस्थापनांनी पुढे येवून ब्रिटीश सेफ्टी कौंसील च्या पुरस्कारांसाठी नोंदनी करण्यापेक्षा आपल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या पुरस्कारासाठी भाग घ्यावा.
यावेळी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य व अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे डायरेक्टर व सी.ई.ओ. संजय लोंढे, हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. याप्रसंगी लोंढे यांनी रस्ता सुरक्षेसंदर्भात काही सुचना केल्या व म्हणाले की “हा माझा आवडता विषय असुन नाशिक फर्स्ट रस्ता सुरक्षेसंदर्भात जागृतीचे अभियान ज्या पद्धतीने चालवित आहेत ते बघुन मलाही नाशिक फर्स्ट सोबत काम करायला आवडेल”.
यावेळी नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले व नाशिक फर्स्टचा प्रवास विषद केला. यावेळी अशोका बिल्डकॉन च्या सुरक्षा विभागाचे हेड अनिल कुमार शिंपी, नाशिक फर्स्ट चे जनरल सेक्रेटरी मिलिंद जांबोटकर, डायरेक्टर सुरेश पटेल, जितेंद्र शिर्के, कार्यकारी सचिव भिमाशंकर धुमाळ, सौ. रम्या दिलीप, प्रशिक्षक श्रीमती सोनाली पवार, मयुर बागुल उपस्थित होते.