नाशिक – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी यंदाची दिवाळी ही प्रदूषणमुक्त व फटाकेमुक्त साजरी करावी. प्रदूषणात भर घालणाऱ्या फटाक्यांना आळा घालून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे फटाके न फोडण्याची शपथ घेऊन जनजागृतीला सुरवात केली आहे.
युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आली असून भारतामध्ये ही लाट येण्याची भीती आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी विविध स्तरावरून विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रदूषणाला आळा घालणे अत्यंत गरजेचे बनले आहे. मध्यंतरी कोरोना बाधित नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना ती पुन्हा वाढू लागली आहे. नाशिकमध्ये थंडीची लाट पसरण्यास सुरवात झाली असून हे वातावरण विषाणूकरिता पोषक असते. थंडीच्या काळात सर्दी, खोकला या आजारासह विविध संसर्गजन्य आजार पसरत असतात. यातच दिवाळी सणात फटाक्यांमुळे प्रदूषण वाढेल व हे प्रदूषण कोरोना विषाणूसाठी अधिक पोषण असेल. दिल्लीमध्ये कोरोना विषाणू पसरण्याचे मुख्य कारण प्रदूषण हे मानले जात असून ते रोखण्यासाठी फटक्यावर बंदी आणली आहे. नाशिकमध्येही दिवाळीच्या खरेदीसाठी सर्व नागरिक घराबाहेर पडताना योग्य काळजी घेताना दिसत नाही. खरेदी करिता प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना विषाणू पुन्हा आपले डोके वर काढू पाहत आहे. लॉकडाऊनच्या काळात नाशिक मधील प्रदूषणात घट झाली होती. परंतु आता पुन्हा प्रदूषण वाढू लागले आहे. यंदाची दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून आपण कोरोना विषाणूला हरवू शकतो. त्याकरिता प्रत्येकाने कोरोना संबधीचे नियम पाळावे व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन अंबादास खैरे यांनी केले आहे.
यावेळी किरण पानकर, डॉ.संदीप चव्हाण, बाळा निगळ, मुकेश शेवाळे, विशाल डोके, रामदास मेदगे, निलेश भंदुरे, राहुल कमानकर, तुषार दिवे, कल्पेश कांडेकर, प्रदीप महाजन, मिलिंद सोळंके, रोहित जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.