नाशिक : गावठी दारूची वाहतूक करणा-या पंचवटीतील एकास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. संशयीताच्या ताब्यातील मारूती व्हॅन व मद्यसाठा असा सुमारे दीड लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेने जिह्यात पुन्हा एकदा हातभट्या सुरू झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
अतुल शशिकांत मुर्तडक (३५ रा.शितळादेवी मंदिर रामवाडी) असे मद्यवाहतूक प्रकरणी अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. मुंबई आग्रा महामार्गावरून गावठी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त अर्जुन ओहोळ,अधिक्षक डॉ.मनोहर अंचुळे व उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्र्र.१ चे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक सुरेंद्र बनसोडे,अरूण सुत्रावे जवान शाम पानसरे,विलास कुवर,धनराज पवार,सुनिल पाटील,अनिता भांड आदींच्या पथकाने गुरूवारी (दि.१८) महामार्गावर सापळा लावला होता. खबºयाने दिलेल्या माहितीवरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणाºया एमएच १५ एएस ९९४१ मारूती व्हॅन अडवून संशयीत चालकास ताब्यात घेत पथकाने वाहन तपासणी केली असता मारूती व्हॅन मध्ये प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये भरलेली गावठी दारू पथकाच्या हाती लागली. या कारवाईत वाहनासह १ लाख ४५ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास दुय्यम निरीक्षक सुरेंद्र बनसोडे करीत आहेत.