नाशिक – ठक्कर बाजार परिसरातील कार्यालयात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर प्रहार संघटनेच्या पदाधिकार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, युवा प्रमुख जगन काकडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी भडांगे, काकडे व इतर दोघांनी इंजिनिअर शरद पवार यांच्या कार्यालयात येऊन पवार यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता भडांगे यांनी पिडीत महिलेस मारहाण केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी इंजिनिअर शरद पवार याने भडांगे तसेच त्यांच्या सहकार्यास चाकूचा धाक दाखवत प्रहार संघटना, बच्चु कडू यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार हनुमानवाडी परिसरात घडला होता. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वादातून सर्व प्रकार घडल्याची चर्चा आहे.