औरंगाबाद – डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाचे संस्थापक, ज्येष्ठ गायक व संगीतकार पंडीत नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे आज रविवारी ( दि.२८ मार्च ) औरंगाबाद येथे रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती. नाथरावांनी आपल्या अवीट स्वरांनी मराठवाड्याचे संगीत क्षेत्र समृद्ध केले.
नाथरावांचा जन्मगाव नांदेड जवळील होळी आहे. त्यांच्या पश्चात अनंत व जयंत नेरळकर ही दोन मुले, हेमा नेरळकर उपासनी ही मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे. गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले व त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतित केले. २०१५ या वर्षी नाथरावांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप प्राप्त झाली. देशाच्या राजधानी दिल्लीत नाथरावांचा सन्मान झाला. असा सन्मान प्राप्त करणारे नाथराव हे मराठवाडय़ातील पहिलेच कलावंत होय. तसेच २०१७ साली त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
संगीत कला आणि कलाकारांना समाजात मान, प्रतिष्ठा नव्हती अशा काळात नाथरावांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले आणि संगीत शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. नाथरावांनी अनेक होतकरू, गरीब विद्यार्थी शोधले. त्यांना गुरुकुलमध्ये स्वखर्चाने शिक्षण दिले. या गुरुकुलामधून जागतिक कीर्तीचे कलावंत घडले. त्यांचा पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सुवर्णपदकाने सन्मान झाला. प्रतिभा निकेतनमध्ये तेरा वर्षे संगीत शिक्षक, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कोलकाता येथील रिसर्च अकादमीचे गुरुपद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुखपद भूषविले.