नाशिक : बँकेतून बोलत असल्याच्या बहाणा करून, भामट्यांनी लिमीट वाढवून देण्याची बतावणी करीत पोलीस कर्मचा-याच्या क्रेडिट कार्डवरून परस्पर खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत गोपनीय माहिती मिळवित भामट्यांनी ८० हजाराची परस्पर आॅनलाईन खरेदी केली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप श्रावण क-हे (रा.स्नेहबंधन पार्क,पोलीस वसाहत) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. क-हे शहर पोलीस दलात कार्यरत असून ते आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. गेल्या २८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास भामट्यांनी त्यांच्याशी ८३०३७९३०४६ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. क-हे यांना बँकेतून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी कार्डचे लिमीट वाढवण्याबाबत विचारपूस केली. यावेळी क-हे यांनी क्रेडिट वाढची पसंती दर्शविली असता ही घटना घडली. कार्डची गोपनिय माहिती आणि ओटीपी नंबर मिळवून भामट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवर पासकर टेक्नालॉजी या कंपनीतून सुमारे ७९ हजार १४ रूपयांची खरेदी केली. ही बाब लक्षात येताच क-हे यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले असून,अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.