पोलीसांच्या कामात अडथळा महिलेवर गुन्हा
नाशिक : शांततेचा भंग केला म्हणून दोघांना ताब्यात घेत असतांना पोलीस कारवाईला अडथळा निर्माण करणा-या एका महिलेविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना क्रांतीनगर झोपडपट्टीत घडली.
संध्या विजय साळवे (रा.सप्तशृंगी मंदिरावजळ क्रांतीनगर) असे संशयीत महिलेचे नाव आहे. पोलीस हवालदार संजय भिसे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. क्रांतीनगर भागात गुरूवारी (दि.१४) सायंकाळी मुंबईनाका पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना सप्तशृंगी मंदिर परिसरातील नगरसेविका प्रियंका घाटे यांच्या कार्यालयावर लहान मुलांसह काही युवक आरडाओरड करीत पतंग उडवित होते. धोकेदायक ठिकाण असल्याने पोलीसांनी धाव घेत पतंग उडविणा-या युवकांना हटकले. यावेळी शांततेचा भंग केल्याप्रकरणी संकेत घाटे आणि राहूल घाटे या युवकांना पोलीसांनी ताब्यात घेत एमएच १५ ईए ०२२८ या वाहनात बसवित असतांना ही घटना घडली. पोलीस ठाण्यात समज देण्यासाठी घेवून जात असतांना संशयीत महिलेने आरडाओरड करीत वाहन अडवून पोलीस कारवाईला विरोध केला. यावेळी संशयीत महिलेने कर्तव्य बजावणा-या पोलीसांशी आरेरावी करीत धाकदडपशा करून धमकी दिली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण शिंदे करीत आहेत.
…….
सिडकोत तीन लाखाची घरफोडी
नाशिक : कुटूंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडून तीन लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचा दागिण्यांचा समावेश आहे. ही घटना सिडकोतील गणेश चौक भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर पांडूरंग फापाळे (रा.तानाजी चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. फापाळे कुटुंबिय मंगळवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून हॉलमधील कपाटातून १ लाख १० हजाराची रोकड आणि दागिणे असा सुमारे ३ लाख ५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उप निरीक्षक शेवाळे करीत आहेत.
….
विवाहितेची माहेरी आत्महत्या
नाशिक : माहेरी आलेल्या विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना चांदगिरी येथे घडली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पुजा अमोल गाढे (मुळ रा.सोनगाव ता.निफाड हल्ली चांदगिरी,शिंदेगावाजवळ) असे आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव आहे. पुजा गाढे ही महिला चांदगिरी येथे आपल्या माहेरी आलेली होती. गुरूवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास तिने आपल्या माहेरील घराच्या पडवीत लोखंडी अँगलला स्कार्प बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कंडारे करीत आहेत.
…..
अपघातात दुचाकीस्वार ठार
नाशिक : दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एका मोटारसायकलवरील चालकाचा मृत्यु झाला. हा अपघात बोराडे मळा भागात झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बाळू किसन वाघमारे (४८ रा. गौळाणे रोड,पाथर्डी शिवार) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. वाघमारे गुरूवारी (दि.१४) पत्नीस सोबत घेवून दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. वाघमारे दांम्पत्य एमएच १५ सीपी १७६९ या दुचाकीने संगमनेर येथे जात असतांना बोराडे मळा येथील एमएसईबीच्या रोहित्र्यासमोर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात वाघमारे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
…….
सिडकोत एकाची आत्महत्या
नाशिक : सिडकोतील पवननगर भागात राहणा-या ४३ वर्षीय इसमाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
भगवान रामदास इंगळे असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. इंगळे यांनी गुरूवारी (दि.१४) आपल्या राहते घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियानी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
……
बालिकेच्या मृतदेहाने खळबळ
नाशिक : पाच वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह नदीपात्रात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर चिमुकली पाण्यात तरंगतांना आढळून आली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गोदानदी पात्रातील एकमुखी दत्तमंदिर परिसरात गुरूवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास पाच वर्षीय बालिकेचा मृतदेह पाण्यात तरंगतांना मिळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून स्थानिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलीसांनी खबर दिली. दरम्यान चिमुरडीची अद्याप ओळख पटलेली नसून ती पाण्यात वाहून आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक गवळी करीत आहेत.
………….