पॉलीशच्या बहाण्याने दागिणे लांबविले
नाशिक : पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी वृध्देची सुमारे सव्वा लाखाची सोन्याची पोत हातोहात लांबविल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना बाळासाहेब थोरात (६३ रा.स्वामी समर्थ सोसा.एरिगेशन कॉलनी समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. थोरात बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास आपल्या बंगल्यात एकट्या असतांना ही घटना घडली. २० ते २५ वयोगटातील दोघा पल्सरस्वार भामट्या तरूणांनी त्यांना गाठले. यावेळी सोन्याच्या दागिण्यांना पॉलीश करून देतो असे सांगून त्यांनी वृध्देची पोत आपल्या ताब्यात घेतली. यावेळी संशयीतांनी पाणी मागण्याच्या बहाणा केल्याने वृध्दा स्वयंपाक घरात गेली असता ही घटना घडली. वृध्दा स्वयंपाक घरात गेल्याची संधी साधत संशयीतांनी सुमारे १ लाख २० हजार रूपयांची पोत घेत काळया रंगाच्या पल्सरवर पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.
……
अॅटोरिक्षाच्या धडकेत महिला ठार
नाशिक : भरधाव अॅटोरिक्षाने धडक दिल्याने महिला ठार झाली. हा अपघात ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात झाला. याप्रकरणी रिक्षाचालकाविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सुशिला सुधाकर मालपूरे असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशिला मालपूरे व त्यांचे पती सुधाकर मालपुरे हे दांम्पत्य गेल्या गुरूवारी (दि.४) रात्री मनसे कार्यालया शेजारील ठक्कर बाजार येथे रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला होता. राजदूत हॉटेल कडून सिबीएसच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १५ झेड ७४८१ या रिक्षाने सुशिला मालपूरे यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि.१०) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुलगा प्रशांत मालपुरे (रा.महाले फार्म,राणा प्रताप चौक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोकवीपुरे करीत आहेत.
…..
महिलेची पोत खेचली
नाशिक : नातवास शिकवणीवरून घरी घेवून जाणा-या पादचारी महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना तपोवनरोडवरील निर्मल कॉलनीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजया सुनिल जगताप (४६ रा.सोनजे मळा,पोतदार शाळेजवळ काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जगताप या बुधवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास शिकवणीसाठी गेलेल्या आपल्या नातवास घेण्यासाठी त्रिकोणी गार्डन भागात गेल्या होत्या. नातवास घेवून त्या भाजी मार्केट मार्गे टाकळीरोडच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. निर्मल कॉलनी भागातून नातवास सोबत घेवून त्या पायी जात असतांना समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळय़ातील सुमारे ६५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.
……
दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला. हा अपघात महात्मानगर ते एबीबी सर्कल मार्गावर झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश धनंजय गायधनी (१८ रा.शुभमपार्क,उत्तमनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुभम गेल्या शुक्रवारी (दि.५) गंगापूररोड भागात गेला होता. गिताई लॉन्स येथून तो सिडकोच्या दिशेने आपल्या ज्युपिटर दुचाकीवर (एमएच १५ एचए १११५) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. जेहान सर्क ल कडून एबीबी सर्कलकडे जात असतांना भरधाव दुचाकी टिव्हीएस मोटार शोरूम समोर दुभाजकावर आदळली. हा अपघात चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने झाला. या अपघातात भावेश गायधनी गंभीर जखमी झाला होता. त्यास तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि.१०) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
……
बेकायदा दारू विक्री एकास अटक
नाशिक : विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणा-या एकास पोलीसांनी जेरबंद केले. संशयीताच्या ताब्यातून प्रिंस संत्रा नावाचे मद्य हस्तगत करण्यात आले असून ही कारवाई चेहडी शिव परिसरातील जयप्रकाशनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजू भास्कर जाधव (रा.जयप्रकाश नगर,प्रबुध्दनगर चेहडीशिव) असे संशयीताचे नाव आहे. जयप्रकाशनगर भागात बेकायदा मद्याची विक्री केली जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास पोलीसांनी संशयीताच्या घरात छापा टाकला असता मद्यसाठा पोलीसांच्या हाती लागला. संशयीताने मद्यविक्रीच्या उद्देशाने आपल्या घरात सुमारे १ हजार ३२६ रूपये किमतीचा मद्यसाठा करून ठेवला होता. याप्रकरणी हवालदार शंकर काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
……
शहरात दोघांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी (दि.१०) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यात ४५ वर्षीय इसमासह १७ वर्षीय युवतीचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सातपूर औद्योगीक वसाहतीतील अशोक नगर भागात राहणारे तुकाराम भागवत गांगुर्डे (४५ रा.कृष्णमंदिराजवळ,पवार संकुल विश्वासनगर) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास फेटा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. कैलास गांगुर्डे यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना दुमाला पंपिग रोड भागात घडली. वैष्णवी अनिल राऊत (१७ रा.सह्याद्रीनगर) या युवतीने बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
……
तीन दुचाकी चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून नुकत्याच तीन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका,अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजीवनगर येथील श्रीकांत प्रसाद लोखंडे (रा.विशाखा कॉलनी,पाथर्डीरोड) हे गेल्या गुरूवारी (दि.४) मुंबईनाका भागात आले होते. डाटा मेटीक्स या डाटा एन्ट्री कार्यालयाबाहेर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ एचडी १९८८ पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत. दुसरी घटना सिडकोत घडली. नांदूकनाका येथील शुभम महेश गर्गे (रा.संत जनार्दन नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गर्गे गेल्या मंगळवारी (दि.२) सिडको भागात आले होते. संभाजी स्टेडीअम परिसरातील पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी आपली पॅशन प्रो दुचाकी एमएच १५ डीएस १८५० पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. तर कुमार नारायण बर्वे (रा.गोरेवाडी,नाईकवाडी जेलरोड) यांची पल्सर एमएच १५ व्हीटी ८४९ रेजिमेंटल प्लाझा पाठीमागील एस.के. चाय दुकानासमोर नेहमीप्रमाणे पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ७ ते १० मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली असून अधिक तपास जमादार साळवे करीत आहेत.
……….