पूर्ववैमनस्यातून कार पेटविल्या
नाशिक : पूर्ववैमनस्यातून गोंधळ घालत दुकलीने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार पेटवून दिल्याची घटना जेलरोड येथील सम्राट चौकात घडली. याघटनेत दोन कारचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमोद चंद्रकांत सोनकांबळे (३५ रा.भिमनगर,जेलरोड) व शशी प्रल्हाद धिवरे (३९ रा.मालधक्का रोड,गुलाबवाडी) अशी कार पेटविणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीराम मकडू चित्ते (५९ रा.रूपभाग्य निवास,सम्राट चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चित्ते सोमवारी (दि.१६) रात्री आपल्या घरी असतांना संशयीतांनी त्याचे घर गाठले. यावेळी संशयीतांनी चित्ते घराबाहेर ये असे म्हणत शिवीगाळ केली. बराच वेळ गोंधळ घालत या दोघांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चित्ते यांच्या एमएच १५ सीएम ५५७९ व एमएच ३७ के ९१९३ या कार ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. या घटनेत दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
…..
कारची परस्पर विक्री
नाशिक : वापरण्यासाठी दिलेली कार एकाने परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत संशयीताने कारमालकाचे बनावट कागदपत्र तयार करून हा उद्योग केला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतेश विश्राम कर्डक (३६ रा.संस्कार रेसि.खोडेनगर) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी दशरथ त्र्यंबक लोणे (३९ रा.भुसारे मळा,दाढेगावरोड,पाथर्डी रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार कर्डक आणि लोणे एकमेकांचे परिचीत असून त्यातून हा विश्वासघात झाला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात लोणे यांची झायलो कार (एमएच १५ डीएम ८०७०) कर्डक याने वापरण्यासाठी नेली होती. मात्र संशयीताने लोणे यांचे बनावट कागदपत्र तयार करून कार आपलीच असल्याचे भासविले. त्यानंतर त्याने ही कार पंकज केशव पाटील (रा.अकोेले रोड,अमरावती) यांना परस्पर विक्री केली. दिवाळी निमित्त लोणे आपल्या वाहनाच्या चौकशी साठी कर्डक यांच्याकडे गेले असता ही घटना उघडकीस आली. ७ सप्टेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान संशयीतांने कारची परस्पर विक्री करून रकमेचा अपहार केला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.