नाशिक – शहर परिसरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अपघात नाशिक-पुणे रस्त्यावरच झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळ््या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पंचक येथील सुभाष संतोष पाटील (४९ रा.जनार्दनस्वामीनगर) हे बुधवारी (दि.२८) रात्री आपल्या मोपेड दुचाकीने नाशिक पुणा रोडने सिन्नर फाटा बाजूकडून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. एकलहरा टी पॉईंट येथे पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिली. या अपघातात पाटील जागीच ठार झाले. याप्रकरणी शशिकांत शाहू यांनी दिलेल्या खबरीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा अपघात शिंदे टोल नाका भागात झाला. संतोष नरसिंग देशमुख (४५ रा.सिध्देश्वरनगर,जेलरोड) हे गुरूवारी (दि.२९) नाशिक पुणा मार्गावरून प्रवास करीत असतांना सुभाष पेट्रोल पंप परिसरातील मेला हॉटेल समोर त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर प्रथम सिन्नर फाटा येथील साई केअर हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.