कारमधून लॅपटॉप चोरी
नाशिक : घरासमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना सराफनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अशोक कुमावत (रा.चिंचवड,पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुमावत शुक्रवारी (दि.२२) कंपनीच्या कामानिमीत्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास ते शहरात राहणा-या बहिणीस भेटण्यासाठी सराफनगर येथे गेले असता ही घटना घडली. बहिणीच्या घरासमोर कार (एमएच १२ पीझेड ५१०१) पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी कारची डाव्याबाजूची काच फोडून ४० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.
…..
सिडकोत ८० हजाराची घरफोडी
नाशिक : सिडकोत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ८० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अबंड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रमेश चव्हाण (रा.गोदावरी अपा.सदगुरूनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण कुटूंबिय बुधवारी (दि.२०) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या कडीकोंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले ३१ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
…….
महिलेवर कोयत्याने वार
नाशिक : घरात ढुंकून पाहतो याबाबत जाब विचारल्याने एकाने विवाहितेवर कोयत्याने वार केल्याची घटना पळसे येथील फुलेनगर भागात घडली. जखमी महिला आपल्या पतीच्या बचावासाठी धावून गेली असता ही घटना घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर अशोक गायधनी (३३ रा.फुलेनगर,पळसे) असे महिलेवर कोयत्याने हल्ला करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी परिसरातील मनिषा गायधनी या विवाहीतेने तक्रार दाखल केली आहे. संशयीत महिलेच्या घरात खिडकीतून डोकावतांना मिळून आल्याने गायधनी दांम्पत्य त्यास जाब विचारण्यासाठी गेले असता ही घटना घडली. संतप्त संशयीताने शिवीगाळ करीत ऊस तोडण्याच्या कोयत्याने महिलेच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पतीच्या बचावासाठी धावून गेल्याने ती जखमी झाली असून तीच्या हातास गंभीर दुखापत झाली आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
…….
दोन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून नुकत्याच दोन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशोका मार्ग भागात राहणारे अनुप भरत राशिनकर हे गेल्या रविवारी (दि.१७) पंचवटी परिसरात गेले होते. दिंडोरी नाका येथील अभिषेक बि बियाणे दुकानासमोर त्यांनी आपली स्प्लेंडर (एमएच १५ एव्ही ४४६९) पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गांगुर्डे करीत आहेत. दुसरी घटना पेठरोडवरील राऊ हॉटेल चौकानजीक घडली. मखमलाबाद येथील पसायदान कॉलनीत राहणारे विष्णू दत्तात्रेय काकड हे गेल्या रविवारी (दि.३) टिडीपीनगर भागात गेले होते. गावराण खानावळीचे पार्किंगमध्ये लावलेली त्यांची युनिकॉर्न (एमएच १५ जीएस ८२७०) चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भोईर करीत आहेत.
…….
विवाहीतेची आत्महत्या पतीवर गुन्हा
नाशिक : माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पती विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक पांडूरंग झगडे (४३ रा.शिवाजीनगर,सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. वैशाली अशोक झगडे (३४) या विवाहीतेने शुक्रवारी (दि.२२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच पती व नातेवाईकांनी तिला तात्काळ नजीकच्या संकल्प रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दरम्यान आपल्या मुलीने पतीच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत विवाहीतेच्या आईने दिली असून, त्यात आर्थिक वादातून मद्याच्या नशेत पतीकडून छळ करण्यात आल्याने,पतीच्या छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक योगीता पाटील करीत आहेत.