नाशिक – बंद पानटपरी फोडून चोरट्यांनी सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात महागड्या सिगारेट पाकिटांचा समावेश आहे. ही घटना वर्दळीच्या फ्रुट मार्केट भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबला अन्नू देवाडीगा (रा.नागचौक,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. देवाडीगा यांची भद्रकालीतील फ्रुट मार्केट परिसरात लक्ष्मी पानस्टॉल नावाचे दुकान आहे. सोमवारी (दि.८) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद पानटपरीचे कुलूप तोडून दुकानातील महागडी व वेगवेगळया कंपनीचे सुमारे ५४ हजार ५२० रूपये किमतीचे सिगारेटचे पाकिटे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
गंगापाडळीत युवकावर धारदारशस्त्राने हल्ला
नाशिक : दोघा भावांचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरूणावर एकाने धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गंगापाडळी येथे घडली. या घटनेत अन्य एक तरूणही जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत. रविंद्र उर्फ जंग्या अरूण साळवे (रा.गंगापाडळी पो.आडगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी मनोज हिरामन वलवे (२५ रा.गंगापाडळी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास संशयीत रविंद्र उर्फ जंग्या साळवे व त्याचा भाऊ सागर साळवे यांच्यात वाद सुरू होता. यावेळी जखमी वलवे व त्याचा मित्र बापू जयराम अनवट हे दोघे वाद मिटविण्यासाठी धावून गेले असता ही घटना घडली. संशयीताने आमच्या भांडणात पडू नका, माझी गावात दहशत आहे असे म्हणून वलवे याच्या डोक्यात तलवारीची मुठ मारून जखमी केले.याचवेळी त्याने वाद मिटविण्यासाठी आलेल्या दोघांवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. अधिक तपास हवालदार चिखले करीत आहेत.
…..
शेजा-याकडून महिलेचा विनयभंग
नाशिक : सोसायटीच्या जिन्यातून उतरत असतांना शेजा-याने महिलेची वाट अडवित विनयभंग केल्याची घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे. संजय कनोजी असे विनयभंग करणा-या संशयीत शेजा-याचे नाव आहे. संशयीत आणि महिला एकाच इमारतीत वास्तव्यास असून ते एकमेकांचे शेजारी आहेत. मंगळवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास महिला इमारती खाली जात असतांना ही घटना घडली. सोसायटीच्या जिन्यातून महिला जात असतांना पाठीमागून आलेल्या संशयीताने तिची वाट अडविली. यावेळी महिलेने त्यास सुनावले असता त्याने तू रोज वेगवेगळया माणसांबरोबर जाते मला माहिती आहे. तुझ्या नव-याकडे सांगतो असे म्हणून विनयभंग केला. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.
….
अपघातातील जखमीचा मृत्यु
नाशिक : अॅटोरिक्षा पलटी झाल्याने जखमी झालेल्या ३४ वर्षीय प्रवाश्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. हा अपघात सावकी ते सटाणा मार्गावर झाला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. योगेश पोपट पवार (रा.सावकी ता.देवळा) असे मृत जखमीचे नाव आहे. योगेश पवार सावकी येथून सटाणा येथे जाण्यासाठी प्रवाशी वाहतूक करणाºया अॅटोरिक्षातून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव अॅटोरिक्षा पल्टी झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या छातीस मार लागल्याने कुटूंबियांनी त्यास थत्तेनगर येथील निम्स हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना मंगळवारी (दि.९) त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.
….
पारिजातनगर येथे तरूणाची आत्महत्या
नाशिक : पारिजातनगर परिसरात राहणा-या २५ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तरूणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विक्रम यशवंत शिंदे (रा.वनविहार कॉलनी) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. शिंदे याने सोमवारी (दि.८) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्याच्यावर जिल्हारूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे हलविले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
….
चक्कर येवून पडल्याने दोघांचा मृत्यु
नाशिक : चक्कर येवून पडण्याचे प्रमाण वाढले असून, मंगळवारी (दि.९) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा मृत्यु झाला. त्यात एका शेतक-याचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर आणि सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राजू हरजित गोरवा (५१ रा.राजवाडा,दसक) हे शेतकरी सोमवारी (दि.८) रात्री आपल्या शेतातील घरासमोर चक्कर येवून पडले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत. तर सातपूर येथील एमएचबी कॉलनीत राहणारे विशाल रामनाथ कुठे (४० रा.रणदिवे हॉस्पिटल समोर) हे मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
…..
भाजल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : शॉटसर्किटमुळे भाजलेल्या एकाचा मृत्यु झाला. ही घटना त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी येथे घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भगवान तुकाराम बेंडकोळी (३५ रा.पपया नर्सरी) असे मृत इसमाचे नाव आहे. बेंडकोळी १ जानेवारी रोजी पपया नर्सरी भागात काम करीत असतांना ही घटना घडली होती. विज पुरवठा करणा-या रोहित्र्यात बिघाड झाल्याने अचानक शॉर्ट सक्रिट होऊन आग लागली होती. या आगीत बेंडकोळी भाजला होता. सुभाष जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि.९) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. घटनेनंतर सव्वा महिना तो मृत्युशी झुंज देत होता. अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत.