नाशिक : शहरात जमावबंदी आदेश लागू असतांना विनापरवाना महापालिका विरोधात सिडकोच्या पाणी प्रश्नी आंदोलन केल्याप्रकरणी नगरसेविका किरण गामणे यांच्यासह सात जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेविका किरण गामणे त्यांचे पती योगेश उर्फ बाळा दराडे,पप्पू काकडे,सुनिल केदार,विकी सांगळे,अभिषेक सिंग आणि ऋषीकेश ताजणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी (दि.७) दुपारच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील जलकुंभ क्र.२ येथे हे आंदोलन करण्यात आले होते. सिडकोतील पाणी प्रश्नी नगरसेविका गामणे यांनी मनपा विरोधात हे आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलीस शिपाई निंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात जमाव बंदी आदेशात पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्रीत येण्यास मनाई असतांना संबधीतांनी जमाव जमवित विनापरवानगी आंदोलन केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.