पाच लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या बिस्कीटची चोरी
नाशिक – कुटूंबिय कामात व्यस्त असल्याची संधी साधत भरदिवसा चोरट्यांनी उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे ५ लाख रूपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेले. ही घटना निर्मला कॉन्व्हेंट शाळा परिसरात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरभी राहूल देशमुख (रा.मधुर रेसि. डी.के.नगर गार्डन समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निर्मला कॅन्व्हेंट या शाळेच्या पाठीमागे राहणा-या देशमुख यांच्या आत्याच्या घरात ही चोरी झाली. आत्या व कुटूंबिय रविवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून देव्हा-यात ठेवलेले दहा तोळे वजनाचे व सुमारे पाच लाख रूपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेले. अधिक तपास शेंडकर करीत आहेत.
…..
दोन मोटारसायकली चोरी
नाशिक : शहर परिसरात वाहनचोरीची मालिका सुरू असून, वेगवेगळ्या भागातून नुकत्याच दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेठरोडवरील मेहरधाम भागात राहणारे अंबादास खंबाईत (रा.राधे रेसि.) यांची मोटारसायकल (एमएच १५ एचएफ ८४५३) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना गेल्या शुक्रवारी (दि.२०) रात्री घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. सिडकोतील पाटीलनगर भागातील कमलाकर गणपतराव मराठे (रा.इच्छामनी चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मराठे मंगळवारी (दि.२४) दुपारी जेलरोड भागात गेले होते. ईश्वर कृपा एन्टरप्रायझेस या दुकानासमोर पार्क केलेली त्यांची एमएच ४१ डब्ल्यू ३९०५ ही सीडी डिलक्स मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार वडघुले करीत आहेत.
……
दोघांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून,मंगळवारी (दि.२४) वेगवेगळय़ा भागात राहणा-या गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विकास पुंडलिक आहेर (३२ रा.संघवी नक्षत्र,पोकार कॉलनी) यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना देवळाली कॅम्प येथील आनंदरोड भागात घडली. रामा वाळू कुंदे (४५ रा.गोडसे मळा,दे.कॅम्प) यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास आनंदरोड येथील डेअरी फार्म गाठून गोशाळेच्या शेड क्रमांक चारच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.