नाशिक : कुटूंबिय कामात व्यस्त असल्याची संधी साधत उघड्या घरात शिरून सुमारे ५ लाख रूपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरणा-या चोरट्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. मखमलाबाद रोडवरील मोरे मळयात ही कारवाई करण्यात आली असून संशयीताने मित्राच्या मदतीने विक्री केलेले बिस्कीट पोलीसांनी हस्तगत केले आहे.शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली.
निवृत्ती भिमराव बुरूंगे (३० रा.गवारे मळा,हनुमानवाडी रोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. सुरभी राहूल देशमुख (रा.मधुर रेसि. डी.के.नगर गार्डन समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. निर्मला कॅन्व्हेंट या शाळेच्या पाठीमागे राहणा-या देशमुख यांच्या आत्याच्या घरात ही चोरी झाली होती. आत्या व कुटूंबिय रविवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून देव्हा-यात ठेवलेले दहा तोळे वजनाचे व सुमारे पाच लाख रूपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस यंत्रणा चोरट्यांच्या मागावर असतांना मंगळवारी (दि.२४) युनिटचे पोलीस नाईक विसाल काठे यांना मिळालेल्या माहितीवरून संशयीतास बेड्या ठोकण्यात यश आले. मोरेमळा भागात चोरटा येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता संशयीत पोलीसांच्या जाळयात अडकला. पोलीस तपासात त्याने गुह्याची कबुली देत मित्र दत्तू सुभाष गोसावी (रा.विठाईनगर,आरटीओ) याच्या मदतीने बिस्कीट विक्री केल्याचे सांगितले. दत्तू गोसावी यास ताब्यात घेवून चौकशी केली असता दोघांनी सराफ बाजारातील नंदकुमार दंडगव्हाळ या सराफ कारागीरास पैश्यांची गरज असून, नंतर पावती आणून देवू असे सांगून बिस्कीट मोडीच्या भावात विक्री केल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सराफ बाजार गाठून सदर बिस्कीट चोरीच्या गुह्यातील असल्याचे सांगितल्याने त्याने पाच लाख रूपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट परत केले.संशयीतासह मुद्देमाल गंगापूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक शेनकर करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे जमादार विजय गवांदे हवालदार रविंद्र बागुल,संजय मुळक,अनिल दिघोळे,येवाजी महाले,वसंत पांडव,प्रविण कोकाटे,विशाल काठे, दिलीप मोंढे,फय्याज सय्यद,आसिफ तांबोळी,मोहन देशमुख,रावजी मगर,महेश साळूंखे,योगीराज गायकवाड,राजेश लोखंडे,शिपाई विशाल देवरे,गणेश वडजे,राहूल पालखेडे,निलेश भोईर,मुश्तार शेख,गौरव खांडरे,प्रविण चव्हाण,प्रतिभा पोखरकर शिपाई समाधान पवार आदींच्या पथकाने केली.