पाच लाखाची खंडणीची मागणी, दोघांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक : कार खरेदी विक्री करणा-या व्यावसायीकास दमदाटी करीत सराईत गुन्हेगार असलेल्या दोघांनी पाच लाखाची खंडणी मागितल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश साबळे व त्याचा हॅरी नामक साथीदार अशी खंडणीखोरांची नावे आहेत. याप्रकरणी राहूल पदमाकर चव्हाण (रा.गुंजाळ अव्हेन्यू.इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल चव्हाण यांचा कार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून, त्यांचे कार्यालय इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील श्रीमंगल गार्डन सोसायटीत आहेत. उड्डाणपुला बोगद्या जवळ असलेल्या कार्यालयात ते गेल्या शनिवारी (दि.२८) बसलेले असतांना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास सराईत आकाश साबळे व हॅरी नामक साथीदाराने चव्हाण यांना गाठून खंडणीची मागणी केली. संशयीतांशी कुठलाही आर्थीक व्यवहार नसतांना त्यांनी तू सचिन विंचू याला पैसे देणे लागतो व सचिन विंचू कडे आमचे पैसे घेणे आहेत. त्यामुळे तू पाच लाख रूपये दे नाही तर एक गाडी दे अशी मागणी करून दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक एम.एस.जाधव करीत आहेत. दरम्यान संशयीत आकाश साबळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द मुंबईनाका,अंबड,पंचवटी,उपनगर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
…….
इंदिरानगरला महागडी सायकल चोरी
नाशिक : इंदिरानगर भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली महागडी सायकल चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना परबनगर परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल रमेश विसपुते (रा.तारांगण सोसा.परबनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विसपुते यांच्या मालकीची सुमारे ३० हजार रूपये किमतीची सायकल २० आॅक्टोबर रोजी रात्री त्याच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास पोलीस नाईक सानप करीत आहेत.
…..
तडीपार गुंड जेरबंद
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर आणि जिल्हयातून तडीपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरातील तडीपारांचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेश राजेंद्र जाधव (२४ रा.सुशांत अपा.गाजरे हॉस्पिटल जवळ,शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. गणेश जाधव याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्यास तडीपार केले आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर असतांना सरकारवाडा पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून त्यास जेरबंद करण्यात आले. सागर स्विट या दुकान परिसरात येणार असल्याच्या माहिती वरून सरकारवाडा पोलीसांनी त्यास गुरूवारी (दि.३) सापळा रचून बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सरकारवाडाचे पोलीस शिपाई नितीन थेटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सोळसे करीत आहेत.
…….
चक्कर येवून पडल्याने कैद्याचा मृत्यु
नाशिक : चक्कर येवून पडल्याने ३५ वर्षीय कैद्याचा मृत्यु झाला. ही घटना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हानीफ अहमद शेख असे मृत कैद्याचे नाव आहे. शेख यास एका गुह्यात शिक्षा झाल्याने तो कारागृहात होता. बुधवारी (दि.२) सायंकाळी तो कारागृहात आवारात असतांना अचानक चक्कर येवून पडला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास मार लागल्याने जेल कर्मचा-यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास उपनिरीक्षरक एन.डी.गोसावी करीत आहेत.
……
चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यु
नाशिक : साफसफाई करीत असतांना चौथ्या मजल्याच्या टेरेसवरून पडल्याने १९ वर्षीय कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना विहीतगाव येथे घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोद करण्यात आली आहे.
जितेंद्र सिंह (१९ रा.आवर्णा हौ.सोसा.तलाठी कार्यालया समोर विहीतगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. जितेंद्र सिंह हा कामगार गुरूवारी (दि.३) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवर साफसफाई करीत असतांना ही घटना घडली. झाडूने झाडत असतांना अचानक पाय घसरल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यास तात्काळ जयराम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ मेडिकल कॉलेज येथे हलविले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.
………….
दोन घरफोडीत ५० हजाराचा ऐवज लंपास
नाशिक : शहरात घरफोडीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प येथील बार्न स्कूल रोड भागात राहणा-या राधा उर्फ सोनल नरबहादुर सिंग (रा.मल्हारीबाबा नगर,भगूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सिंग कुटूंबिय आडकेनगर भागात काही दिवसांसाठी गेले असता २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक आणि कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली सोनसाखळी आणि कानातील दागिणे असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील भूजबळ फार्म परिसरातील कोशिकोनगर भागात घडली. याप्रकरणी मृन्मयी चद्रकांत बाविस्कर (रा.पुष्कर चिंतामनी कॉम्प्लेक्स,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बाविस्कर यांच्या कोशिकोनगर येथील यशोदा पार्क मधील ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी गॅलरीच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील फर्निचर बनविण्याचे सुमारे २७ हजार ७५ रूपये किमतीची मशीनरी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिवाजी सोनवणे करीत आहेत.
…..