नाशिक: नाशिक जिल्हयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींनी विविध योजनांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम करतानाच पर्यावरण संवर्धनासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरण समृध्द गाव बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये आज कोरोना नियमांचे पालन करुन माझी वसुंधरा अभियानाबाबत निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पुढे बोलताना श्रीमती लीना बनसोड यांनी प्रत्येक गावाने पाण्याचा ताळेंबद तयार करणे आवश्यक असल्याचे सांगत नवीन घरांच्या बांधकामांना परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट बंधनकारक करण्याच्या सुचना दिल्या. तसेच प्लॅस्टिकचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सौर उर्जेचा वापर, वृक्षांची लागवड आदि घटकांवर त्यांनी माहिती दिली. ग्रामपंचायतींनी केलेल्या नियोजनाचा व सुरु केलेल्या उपक्रमांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनीदेखील याबाबत आढावा घेताना या अभियानासाठी महिला व शालेय मुलांना सहभागी करुन घेण्याच्या सुचना देतानाच सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक संस्था तसेच घरगुती स्तरावर वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घ्यावयाच्या विविध घटकांविषयी माहिती दिली. नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडीत यांनी नद्यांचे प्रदुषण कमी करणे तसेच डोंगरांवर वृक्ष् लागवड करणे याबाबत मार्गदर्शन केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी माझी वसुंधरा अभियानामध्ये समविष्ट असलेल्या सर्व घटकांबाबत तसेच गुणांबाबत माहिती दिली. आढावा बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार, निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीसाठी नेमलेले संपर्क अधिकारी आदि उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविण्यात येत असून, शासनाने १० हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची यासाठी निवड केलेली आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंचतत्वानुसार चांगली कामे करणार्या गावांचा शासनाकडून गौरव केला जाणार आहे. माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या खातेप्रमुखांना कामांचे वाटप करुन देण्यात आल्याची माहिती इशाधिन शेळकंदे यांनी दिली. माझी वसुंधरा अभियानासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्यावर नोडल अधिका-याची जबाबदारी देण्यात आली आहे.
अभियानात करण्यात येणारी कामे
अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे या मुद्यांशी संबंधित कामे केली जातील. तर वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच नदी-नाले यांची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जाईल.
अभियानात निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायती
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये १) नगरसुल (ता. येवला) २) अंदरसूल (ता. येवला) ३) प्रिंप्री सैय्यद (ता. नाशिक) ४) पळसे (ता. नाशिक) ५) उमराणे (ता. देवळा) ६) कसबेसुकेणे (ता. निफाड) ७) चांदोरी (ता. निफाड) ८) विंचूर (ता. निफाड) ९) पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) १०) नामपूर (ता. बागलाण) ११) कसबेवणी (ता. दिेंडोरी) १२) वडनेर भैरव (ता. चांदवड) १३) दाभाडी (ता. मालेगाव) ग्रामपंचायतींचा समावेश आहे.