नाशिक : भारतीय सैन्यदलात ४० वर्षे सेवा बजावलेला टी ५५ हा बहुचर्चित रणगाडा बुधवारी सिडकोतील लेखानगर येथे चबुतऱ्यावर बसविण्यात आला. लवकरच या जागेचे सुशोभीकरण करून लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती प्रभाग क्र. २४ मधील शिवसेना नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी दिली.
भारतीय सैन्यदलाच्या पराक्रमाची महती सर्वसामान्य जनतेला कळावी आणि तरुणानांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी शिवसेना नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी केंद्र स्तरावर पाठपुरावा करून सैन्यदलात ४० वर्षे सेवा बजावलेला टी ५५ हा बहुचर्चित रणगाडा मंजूर करून आणला. लेखानगर येथील नाशिक महापालिकेच्या मोकळ्या जागेवर हा रणगाडा बुधवारी बसविण्यात आला.
१९६० ते १९८० या काळात सीमाहद्दीवर या रणगाड्याने पाकिस्तानी सैन्यदलात दहशत निर्माण केली होती. टी ५५ या रणगाड्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे ५८ रणगाडे नष्ट केले होते. नाशिकच्या वैभवात भर घालणारा हा रणगाडा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे. लष्कराच्या तोफखाना विभागाचे लेखानगर येथे वित्त विभागाचे कार्यालय आहे आणि लेखानगर हे जुने सिडकोचे प्रवेशद्वार असल्याने हा टी ५५ रणगाडा लेखानगर येथे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या रणगाड्यासाठी महापालिकेच्यावतीने काँक्रीटचा भव्य चबुतरा उभारण्यात आला आहे. बुधवारी हा रणगाडा मोठ्या क्रेनच्या सहाय्याने चबुतऱ्यावर बसविण्यात आला. लवकरच या जागेभोवती उद्यान विकसित करून लोकार्पण करण्यात येणार असल्याचे नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी सांगितले.