नाशिक – रिपब्लिक न्युज इंडियाचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी ईदगाह मैदानावर निषेध आंदोलन केले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी महाविकास आघाडीचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे, प्रदेश भाजपा नेते लक्ष्मण सावजी, प्रदेश भाजपा उपाध्यक्ष खा.डॉ.भारती पवार, आ.सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस सुनील केदार, सरचिटणीस पवन भगूरकर, भाजपा नेते देवदत्त जोशी आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीच
यावेळी पदाधिका-यांनी सांगितले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते आणि आज या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करून खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन त्याला वाचा फोडणाऱ्या निर्भीड पत्रकार अर्णब गोस्वामींना दडपशाहीचा वापर करत अटक केली. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीच लागल्याचे दिसत आहे.