पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप व ५ हजार रुपयांचा दंड
नाशिक – पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप व ५ हजार रुपयांचा दंड अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी ठोठावला आहे. जयराम किसन भोये (रा. म्हसोबा नगर, पेठरोड) असे आरोपीचे नाव आहे. कुरापत काढून पत्नीस मारहाण करीत तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत पतीने जीवे मारले होते.
या गुन्ह्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. पत्नीने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबास न्यायालयाने ग्राह्य धरत जयरामला पत्नीचा खून केल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावली. जयराम भोये याचा कांताबाई जयराम भोये यांच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. २४ जानेवारी २०१६ रोजी कांताबाई या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला मुलगी झाल्याने तिला पहावयास गंजमाळ येथे गेली होती. त्यामुळे २५ जानेवारीला जयराम हा कांताबाईच्या मुलाच्या घरी गेला व तुझ्या मुलांचे लग्न झाले असून तु त्यांच्याकडे जायचे नाही असे सांगत आरडाओरड करीत कांताबाईला बळजबरीने घरी आणले. रात्री १०.३० च्या सुमारास जयरामने पुन्हा कुरापत काढून तु मला न विचारता तुझ्या मुलाकडे का गेली असे विचारून वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत कांताबाईला मारहाण केली. त्यानंतर कांताबाईच्या अंगावर राॅकेल ओतून तिला पेटवून दिले. जखमी अवस्थेत कांताबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कांताबाई यांच्या फिर्यादीनुसार जयराम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बी. एम. देशमुख यांच्याकडे कांताबाई यांनी जबाब दिला तसेच कार्यकारी न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे जबाब देत जयरामविरोधात तक्रार दिली. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांच्या पथकाने तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. डॉ. सुधीर एस. कोतवाल यांनी युक्तीवाद केला.
…..
देवळाली गावात गळफास घेत आत्महत्या
देवळाली गावातील तेली गल्ली परिसरात ५३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. संजय नरसिंहराव देशमुख (५३) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय यांनी शुक्रवारी (दि.५) राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
…..
कुरापत काढून विक्रेत्यास मारहाण
मोमोज कच्चे आहे अशी कुरापत काढून एकाने विक्रेत्यास मारहाण केल्याची घटना गंगापूर रोडवरील शहीद सर्कल जवळील परिसरात घडली. याप्रकररी टिकाराम नारायण पंगेनी (३०, रा. जेलरोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात किरण बाळासाहेब फडोळ विरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. किरण याने गुरुवारी (दि.४) रात्री कुरापत काढून टिकाराम यास मारहाण करीत दमदाटी केली.
…..