पत्ता विचारण्याचा बहाण्याने दुचाकीस्वाराने गळयातील मंगळसुत्र ओरबडले
नाशिक : पत्ता विचारण्याचा बहाणाकरून दुचाकीस्वार दुकली पैकी एकाने महिलेच्या गळयातील गंठण आणि मंगळसुत्र ओरबाडून नेल्याची घटना सामनगाव रोड भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजूळा लक्ष्मण वाघचौरे (६० रा.शिवअमृत अपा.भागवत मळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंजूळा वाघचौरे या सोमवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास इमारतीच्या तळ मजल्यावर राहणा-या सुमनबाई भागवत यांच्या घरासमोर गप्पा मारत असतांना ही घटना घडली. दोन्ही महिला गप्पा मारत असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्यांपैकी एकाने पत्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी वृध्दा पत्ता सांगत असतांना भामट्यांने त्यांच्या गळय़ातील गंठण आणि मंगळसुत्र असा सुमारे १ लाख ७५ हजार रूपये किमतीचे दागिणे ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
…..
तडीपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : शहर आणि जिह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेले असतांना परवानगी न घेता राजरोसपणे शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे संशयीतास आपल्याच घरात जेरबंद करण्यात आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश राजाराम म्हस्के (४६ रा.फ्लॅट.नं.४.शिवगंगा अपा.पाण्याच्या टाकी जवळ,जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तडिपाराचे नाव आहे. गुन्हेगारी कारवायांमुळे म्हस्के यास परिमंडळ २ चे उपायुक्तांच्या आदेशान्वये दीड महिन्यांपूर्वीच शहर आणि जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र संशयीतांचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. सोमवारी (दि.८) तो आपल्या घरात असल्याची माहिती पोलीसांना मिळताच छापा टाकला असता तो आपल्या घरात विनापरवानगी मिळून आला. याप्रकरणी कुंदन राठोड या पोलीस कर्मचा-याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक वटाने करीत आहेत.
……..
महिलेस कोयत्याचा धाक दाखवित जीवे ठार मारण्याची धमकी
नाशिक : भाडेकरूची माहिती विचारत एकाने महिलेस कोयत्याचा धाक दाखवित जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना अशोकनगर भागात घडली. या घटनेनंतर संशयीताने परिसरात कोयत्याचा धाक दाखवून अनेकांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप दुलाजी खंदारे (२७ रा.श्रमिकनगर) असे दहशत पसरविणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी ललित दिनेश गवांदे (रा.राज्य कर्मचारी वसाहत,अशोकनगर) याने तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.८) संशयीताने गवांदे यांचे घर गाठून पूर्वी राहत असलेल्या भाडेकरूची माहिती घेतली. यावेळी ललितची काकू कावेरी गवांदे यांनी त्यास आम्हाला माहित नसल्याचे सांगितल्याने संतप्त संशयीताने कोयत्याचा दाखवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संशयीताने परिसरात शिवीगाळ करीत येणा-या जाणा-यांना कोयता दाखवून दहशत माजविली. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.