पंचवटी परिसरात वेगवेगळया अपघातात दोन ठार
नाशिक : पंचवटी परिसरात अपघाताचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या अपघातांमधील दोन गंभीर जखमींचा बुधवारी (दि.३०) मृत्यु झाला. त्यात एका पादचा-यासह दुचाकीस्वाराचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमानवाडीतील यशवंत मोतीराम लोखंडे (५५ रा.बालाजी अपा.प्राध्यापक कॉलनी) हे मंगळवारी (दि.२९) सकाळी मखमलाबाद रोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना अपघात झाला होता. ओमसाई हॉटेल समोर भरधाव दुचाकी घसरल्याने लोखंडे गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक संजीवणी हॉस्पिटल येथे दाखल केले असता बुधवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत. दुसरा अपघात १ जून रोजी महामार्गावरील पंचवटी कॉलेज समोर झाला होता. भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय अनोळखी पादचारी जखमी झाला होता. विष्णू गायकवाड यांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना बुधवारी त्याचा मृत्यु झाला. सदर इसमाची अद्याप ओळख पटली नसून अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.
…..