नाशिक – येथील न्यायालय पुन्हा अडीच तासांच्या दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे न्यायालयीन कामकाज पुन्हा मंदावणार असून वकीलांसमोर पुन्हा रोजीरोटीचा तर पक्षकारांसमोर न्याय उशिराने मिळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात कोरोना रूग्णांची प्रचंड वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई हायकोर्टाने आदेश काढले आहेत. त्यानुसार, नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी नाशिक मधील न्यायालय आजपासून (२६ मार्च) पुढील आदेशापर्यंत दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता न्यायालय प्रथम सत्रासाठी सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुस-या सत्रासाठी दुपारी दीड ते ४ या वेळेत राहणार आहेत.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अनिल गोवारदिपे यांनीही एक परिपत्रक काढून वकीलांना आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामासाठीच कोर्टात यावे. शक्य असल्यास लवकरात लवकर प्रकरणांमध्ये पुढील तारीख घेऊन न्यायालय परिसरातून वकीलांनी निघून जावे. राज्यात पुंन्हा लॉकडाऊन सुरू झाले तर अनेक वकिलांवर उपासमारीची वेळ येईल. तसेच पक्षकारांनाही उशिरा न्याय मिळेल. त्यामुळे दोन्ही वर्गांचे मोठे नुकसान होण्याची भिती आहे.

