नाशिक – नो एन्ट्री मध्ये मालट्रक पार्क केल्याप्रकरणी कारवाई करणा-या वाहतूक पोलीसास चालकाने मारहाण केल्याची घटना द्वारका भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बाळासाहेब कुडीराम महाजन (४२ रा. विजयनगर,फुलेनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक प्रदिप चरणदास पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. वर्दळीच्या द्वारका परिसरात पोलीस नाईक पाटील सेवा बजावत असतांना संशयीताने परिसरातील नो एण्ट्री मार्गावर आपल्या ताब्यातील मालट्रक एमएच १५ एफएच ५००१ पार्क केला. यावेळी पाटील यांनी चालकास आपले वाहन काढून घेण्याचा सल्ला दिला असता त्याने आरेरावी केली. त्यामुळे पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला असता ही घटना घडली. संतप्त चालकाने तुम्ही पोलीस वाले माजले आहेत असे म्हणत थेट खाकीवर हात टाकला. माझ्या गाडीवर पेंडीग केस आल्यास जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देत संशयीताने पाटील यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.या घटनेत संशयीताने दगड फेकून मारला मात्र पाटील यांनी तो वेळीच चुकवल्याने अनर्थ टळला. संशयीतास पोलीसांनी अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोमनाथ गेंगजे करीत आहेत.