नोकराचा मोबाईलसह रोकडवर डल्ला
नाशिक : दुकानात काम करणा-या नोकराने मालकाच्या दोन मोबाईलसह रोकडवर डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव कांबळे (रा.सायखेडा ता.निफाड) असे संशयीत नोकराचे नाव आहे. याप्रकरणी अमोल सुभाष खैरणार (रा.हनुमानवाडी,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. खैरणार यांचे सिध्दीविनायक चौकात श्री सर्वज्ञ ट्रेंडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात संशयीत कामास होता. २ ते ५ एप्रिल दरम्यान संशयीताने दुकानातून दोन मोबाईल व ९ हजाराची रोकड असा सुमारे २२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.
…..
विसेमळयात टोळक्याचा धुमाकुळ
नाशिक : सुरक्षा रक्षकास मारहाण करीत टोळक्याने दगडफेक केल्याची घटना विसेमळा भागात घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून कारची काच फोडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश,आकाश,डॉलर भाऊ व त्यांचा एक साथीदार अशी संशयीत टोळक्यांची नावे आहेत. कार्तिक धनंजय साळुंके (१७ रा.पाटील प्रेसिडेन्सी,विसेमळा,कॉलेजरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साळुंके रविवारी (दि.४) आपल्या इमारतीच्या आवारात मित्रांसमवेत गप्पा मारत असतांना संशयीतांचे टोळके तेथे आले. त्यांनी मित्राच्या दिशेने दगड फेक केली. या घटनेत साळुंके याच्या हातास दगड लागल्याने तो जखमी झाला आहे. यावेळी टोळक्याने पाटील प्लाझा या सोसायटीच्या सुरक्षारक्षकास मारहाण करीत शेजारी शेळके यांच्या वॅगनर कारची काच फोडून नुकसान केले. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
……