नाशिक : नायलॉन मांजा विक्री,निर्मीती आणि साठा करण्यास बंदी असतांना राजरोसपणे मांजाची वाहतूक करणा-या तीघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई नाशिक पुणे मार्गावरील शिंदेगाव परिसरात करण्यात आली. या कारवाईत कारसह नायलॉन मांजाचे गट्टू (फिरक्या) असा सुमारे ३ लाख ६६ हजार ६००रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
करण दिपक बत्ताशे (२२ रा.प्रगती सोसा.टॅक्टर हाऊस मागे,द्वारका),अक्षय रविंद्र लोेंढे (२५ रा.लोंढे गल्ली,सिन्नर) व साहिल सुनिल बागडे (१९ रा.प्रगती रो हाऊस टॅक्टर हाऊस मागे,द्वारका) अशी मांजाची बेकायदा वाहतूक करणा-या संशयीतांची नावे आहेत. सिन्नर येथून नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात असून त्याची नाशिक शहरात विक्री केली जात असल्याची माहिती युनिट १ चे कर्मचारी प्रविण चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.८) पुणे नाशिक मार्गावर वेगवेळया ठिकाणी सापळे लावण्यात आले होते. शिंदे टोलनाक्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणा-या अल्टोकार (एमएच १५ एएच ६३५३) पोलीसांनी अडविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसाची चाहूल लागल्याने चालकाने आपले वाहन दामटले मात्र दुसºया पथकाने लावलेल्या सापळयात ते अडकले. पोलीसांनी संशयीतांना ताब्यात घेवून वाहन तपासणी केली असता डिक्कीत ३० हजार ६०० रूपये किमतीचे ५१ गट्टू मिळून आले. पोलीस तपासात अक्षय लोढे याने मुंबई येथील एस.एस.पतंग या व्यापा-याकडून मांजा विक्रीसाठी खरेदी केल्याचे सांगून त्याने घरात एक बॉक्स ठवलेला असल्याची कबुली दिली. पोलीसांनी सिन्नर येथील घरातूनही ६० गट्टू् असलेला सुमारे ३६ हजार रूपये किमतीचा बॉक्स जप्त केला आहे. या कारवाईत ६६ हजार ६०० रूपये किमतीचा घातक मांजा आणि कार असा ३ लाख ६६ हजार ६०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त संग्रामसिह निशाणदार,पौर्णिमा चौगुले – श्रींगी,सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर,युनिटचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,रघुनाथ शेगर,दिनेश खैरणार,उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे,अंमलदार काशिनाथ बेंडकुळे,येवाजी महाले,प्रविण कोकाटे,संजय मुळक,अनिल दिघोळे,विशाल काठे,दिलीप मोंढे,फय्याज सय्यद,आसिफ तांबोळी,महेश साळुंके,योगीराज गायकवाड,मनोज डोंगरे,मोतीराम चव्हाण,प्रविण वाघमारे,मोहन देशमुख,प्रविण चव्हाण,निलेश भोईर,विशाल देवरे, गौरव खांडरे,समाधान पवार आदींच्या पथकाने केली.