नाशिक – ”उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली आहे. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर विपरीत परिणाम झाला आहे. पालकमंत्र्यांची पैशांची मागणी अधिक असली, तरी मध्य मार्ग काढण्यात आला आहे”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी त्यांनी नागपूर व नाशिक मेट्रोसाठी राज्याच्या वाट्याला आलेला भार उचलणार असेही त्यांनी सांगितले.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच जिल्ह्याची वार्षिक योजनेची आढावा बैठक नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की नंदुरबार, धुळे, नगर या आदिवासी जिल्ह्यांसाठी अोटीएस वेगळा निधी आहे. निधीचे वाटप सूत्र ठरवलंय असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी सांगितले की, साहित्य संमलेनासाठी राज्यसरकारकडून ५० लाखांचा निधी देण्यात आला आहे.नाशिक जिल्हयाला १५१ वर्षे पूर्ण झाली, यासाठी वेगळा निधी देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी नंदुरबार जिल्ह्याला सर्वसाधारणमधून १३० कोटी, जळगावला ४०० कोटी रुपये मंजूर, धुळ्यासाठी २१० कोटी रुपये मंजूर केले. नाशिक जिल्ह्याला ८७० कोटी, नगरसाठी ५१० कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढील वर्षांपासून जिल्ह्यातंर्गत आव्हान निधी स्पर्धा घेऊ, जो जिल्हा प्रथम येईल त्या जिल्ह्याला ५० कोटींचा अतिरिक्त निधी देऊ असे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा सर्व राज्यासाठी असेल. आर्थिक ओढाताण असली, तरी स्थानिक विकास निधीला कट लावलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विविध प्रश्नांना असे दिले उत्तर
मुंबई लोकलच्या वेळेबाबत टप्प्या टप्प्यानं निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी १२ आमदारांच्या नावाची शिफारस नियमाप्रमाणेचं केलीय, राज्यपालांनी ती मंजूर करायला हवी असेही ते एका प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले. शेतकऱ्यांबाबतही मोदी भावुक झाले तर आनंद होईल असा टोलाही त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देतांना लगावला. शिवसेनेनं विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेसने उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याच्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत मतपत्रिका असणे यात काहीही अर्थ नाही, आम्हीही मतदान यंत्राच्या माध्यमातूनचं निवडून आलोय असेही ते म्हणाले. हरल्यानंतर ती एक संधी असते मतदान यंत्रामुळे हरलो म्हणायची असेही ते म्हणाले. धुळ्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, प्रांताध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणतील.